दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांमध्ये बालगोविंदांचा समावेशच नसावा या बालहक्क संरक्षण आयोगाच्या ठाम भूमिकेला न जुमानता आपलेच घोडे दामटू पाहणाऱ्या गोविंदा पथकांना चांगलीच चपराक मिळाली आहे. परळ येथील केईएम रुग्णालयानजीकच्या गुरनानी चौकात दरवर्षी नारळी पौर्णिमेला दहीहंडी सराव शिबिराचे आयोजन करण्यात येते. त्यात अनेक बालगोविंदांचा समावेश असतो. यंदा मात्र या ठिकाणी १२ वर्षांखालील मुलांना दहीहंडी फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. युवा सेनेचे पदाधिकारी अमर उर्फ बाबू गुप्ता यांनी तसा दंडकच केला आहे.
दरवर्षी नारळी पौर्णिमेचा मुहूर्त साधून मुंबईत ठिकठिकाणी कच्छी बाजाच्या तालावर चोर गोविंदा काढले जातात. या दिवशी रात्री उशिरापर्यंत गोविंदा पथकांची दहीहंडी फोडण्याची रंगीत तालीम सुरू असते. उद्या, रविवारी नारळी पौर्णिमेनिमित्त मुंबईत दहीहंडी सराव शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, गुरनानी चौकातील सराव शिबिरात बालगोविंदांना अटकाव करण्यात आला आहे. केवळ दक्षिण मुंबईतीलच नव्हे तर उपनगरांतील अनेक गोविंदा पथके दरवर्षी या सराव शिबिरात सहभागी होऊन दहीहंडी फोडून जातात. मात्र या सराव शिबिराच्या आयोजकांनीच बालगोविंदांना अटकाव करण्याचा निर्णय घेतला आहे. शिबिरात १२ वर्षांखालील मुलांना दहीहंडी फोडता येणार नाही याची गोविंदा पथकांनी दखल घ्यावी, अशा आशयाचे मोठे फलक गुरनानी चौकात आणि परिसरात झळकविण्यात येणार आहेत. ठिकठिकाणी दहीहंडय़ा फोडून मिळणाऱ्या इनामाच्या पैशातून गोविंदा पथके दिवसभराचा खर्च भागवित असतात. परंतु आता आयोजकांच्या या इशाऱ्यामुळे आर्थिक गणित कोलमडण्याची चिन्हे निर्माण झाल्याने गोविंदा पथकेही धास्तावली आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा