सर्वोच्च न्यायालय आणि बाल हक्क संरक्षण आयोगाचे आदेश धुडकावून सोमवारी मुंबई-ठाण्यात दहीहंडी उत्सवात नेहमीचाच धुडगूस मांडला गेला. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत, आवाजाची मर्यादा धुडकावून लावत, हंडीच्या उंचीचे नवे थर गाठत बडय़ा दहीहंडी आयोजकांनी ‘विवेकाचा आवाज’ अक्षरश: दाबला. त्यामुळे सोमवारीही दोनशेहून अधिक गोविंदांना जखमी होऊन रुग्णालयात दाखल व्हावे लागले, वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल शेकडो जणांवर कारवाई झाली आणि सभ्यपणाच्या मर्यादाही खुंटीवर टांगल्या गेल्या.
लाखोंची बक्षिसे, ढोल ताशांचा गजर, सिनेतारकांच्या हजेरीचा झगमगाट आणि राजकीय नेत्यांचा आशीर्वाद लाभलेल्या शेकडो हंडय़ांभोवती मुंबईतील असंख्य गोिवदा पथके रात्रीपर्यंत भिरभिरत होती. आगामी विधानसभेच्या राजकीय लोण्यावर डोळा ठेवून उत्सवाचे आयोजन करणाऱ्या नेत्यांनी मनसोक्त ध्वनिप्रदूषण करीत परिसरातील रहिवाशांना वेठीस धरले तर, आठ ते दहा थरांच्या उंचीवर लटकणाऱ्या हंडीभोवतीच्या लाखोंच्या बक्षिसांमुळे गोविंदा पथकांच्या उत्साहाला भलते उधाण आले.
बाल हक्क संरक्षण आयोगाने १२ वर्षांखालील मुलांच्या थरातील वापरावर र्निबध घातले होते. सर्वोच्च न्यायालयानेही आयोगाच्या निर्णयाचे समर्थन केले होते. मात्र, त्यानंतरही सोमवारी दिवसभर अनेक ठिकाणी वरच्या थरात चिमुरडय़ा गोविंदांनाच चढवले जात होते. हा प्रकार रोखण्याऐवजी आयोजकही त्यांना प्रोत्साहन देताना दिसत होते. पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे गोविंदा पथकांना चेव चढला होता. थर रचणाऱ्यांना सुरक्षा पट्टा देण्याचे, तसेच दहीहंडीच्या खाली गाद्या अंथरण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र एकाही आयोजकाने या आदेशाचे पालन केले नाही. दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदाच्या डोक्यावर हेल्मेट दिसत होते. त्याव्यतिरिक्त सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या.
गोविंदा पथके आणि दहीहंडी आयोजकांच्या धिंगाण्याचा फटका मुंबईतील वाहतुकीलाही बसला. भर वर्दळीच्या रस्त्यांवरच लटकलेल्या हंडय़ा आणि ती फोडण्यासाठी, पाहण्यासाठी झालेली गर्दी यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच गोविंदांनी भरलेले ट्रक आणि सुसाट धावणाऱ्या गोविंदांच्या दुचाक्या यामुळे किरकोळ अपघात होऊन वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकारही घडले. अनेक ठिकाणी बेस्टच्या बसगाडय़ांचे मार्ग बदलण्यात आल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला होता.
एके काळी दहीकाल्याच्या दिवशी गोविंदा पथके दहीहंडी फोडण्याबरोबरच विविध सामाजिक प्रश्न, पौराणिक कथांवर आधारित चित्ररथ काढत होते. समाज प्रबोधनाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे कार्य होते. मात्र काही वर्षांपासून उंच दहीहंडी फोडण्याची चुरस गोविंदा पथकांमध्ये लागल्याने हळूहळू गोपाळकाल्यातून चित्ररथ गायब झाले.
पुढील आठवडय़ात कारवाई होणार?
अनेक ठिकाणी रचण्यात येणाऱ्या थरांचे पोलिसांकडून चित्रीकरण सुरू होते. मोठय़ा संख्येने गोविंदा रस्त्यावर उतरल्याने कारवाईचा बडगा उगारताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता. त्यामुळे पोलिसांनी थरांचे चित्रीकरण करून ठेवले असून बालगोविंदांचा थरात वापर करणारी पथके आणि आयोजकांवर पुढील आठवडय़ात कारवाई केली जाईल, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
२५५८ गोविंदांवर वाहतूक पोलिसांची कारवाई
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल संध्याकाळी सहापर्यंत तब्बल २५५८ गोविंदांवर कारवाई करण्यात आली. मद्य प्राशन करून गाडी चालवल्याबद्दल ८४ गोविंदा, तर दुचाकी चालवताना हेल्मेट न घातल्याबद्दल २०४४ गोविंदा कचाटय़ात सापडले. एकाच दुचाकीवरून तीन-तीन गोविंदांनी प्रवास केल्याबद्दल ३५२ चालकांवर कारवाई झाली. तर ट्रकच्या केबिनवर बसून जाणाऱ्या ७८ जणांवर कारवाई करण्यात आली. तर नाकाबंदीत ५० जणांवर कारवाई करण्यात आली.