वांद्रे पूर्व येथे मोबाइल पडल्यामुळे ५०० रुपये नुकसानभरपाई मागणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची दोघांनी गुरुवारी हत्या केली. याप्रकरणी मृत व्यक्तीच्या पत्नीच्या तक्रारीवरून निर्मल नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतले आहे.नाझीम खान (२५) याच्या हत्येप्रकरणी शादाब चाँद मोहम्मद खान व त्याचा भाऊ शानू चाँद मोहम्मद खान या दोघांना निर्मल नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नाझीमचा मृतदेह शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात शवविच्छेदनालासाठी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा >>>“अदाणी शेअर बाजारातील ‘बिग बुल’, तर मोदी त्यांच्यासाठी…”; ‘काऊ हग डे’वरून शिवसेनेचं टीकास्र!
वांद्रे पूर्व येथील गरीब नगर परिसरात वास्तव्यास असलेला नझीम २०-२५ दिवसांपूर्वी मोबाइलवर संभाषण करीत उभा होता. त्यावेळी आरोपी शादाबचा त्याला धक्का लागला. त्यामुळे मोबाइल खाली पडला आणि त्याचे नुकसान झाले. त्यावेळी शादाबने मोबाइल संच दुरूस्तीचा संपूर्ण खर्च देण्याचे मान्य केले. त्या मोबाइल संचाच्या दुरूस्तीसाठी नाझीम यांना हजार रुपये खर्च आला होता. त्यापैकी ५०० रुपये शादाबने दिले होते. गुरूवारी रात्री उर्वरित ५०० रुपये देण्यावरून नाझीम व शादाब यांच्यात भांडण झाले. त्यावरून संतापलेल्या शादाब व शानू या दोघांनी नाझीमला लाथाबुक्क्याने मारहाण केली. शानुने नाझीमवर चाकूने वार केले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. यावेळी भांडण सोडवण्यासाठी गेलेला नाझीमचा भाचा फैजान यांच्यावरही आरोपीने हल्ला केला. आरोपीने फैजानच्या गळ्यावर वार केला. फिजा नाझीम खान (२१) हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. वांद्रे पूर्व येथील फलाट क्रमांक ७ जवळील कॅन्टीन शेजारच्या शिडीजवळ हा प्रकार घडला. फैजान याला भाभा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. उपचार करून त्याला घरी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.