मुंबई : राजकारणातील घराणेशाहीबाबत बोटे मोडणाऱ्यांचे हातही मोजताना अपुरे पडतील, अशी सग्यासोयऱ्यांची जंत्री यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. काँग्रेसमधील घराणेशाहीला नेहमीच लक्ष्य करणाऱ्या भाजपसह शिवसेना (ठाकरे), मनसे, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) या पक्षांनी आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत एकाच कुटुंबातील दोन किंवा त्याहून अधिक जणांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे, एकाच कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीला एका पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास पक्षांतर करून उमेदवारी पदरात पाडून घेण्यात येत असल्याचे प्रकारही यंदा घडत आहेत.
‘एक कुटुंब, एक उमेदवार’ असे तत्त्व पाळणाऱ्या भाजपनेही यंदा आपल्या यादीत नात्यागोत्यांना महत्त्व दिले आहे. खासदार नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे कणकवलीतून लढत असताना दुसरे पुत्र नीलेश यांना कुडाळमधून उमेदवारी देता यावी, म्हणून त्यांना शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश दिला जाणार आहे. दुसरीकडे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार हे वांद्रे पश्चिममधून तर त्यांचे बंधू विनोद हे मालाड पश्चिममधून् निवडणूक लढणार आहेत. अशी अनेक उदाहरणे भाजपच्या यादीत दिसत आहेत.
गेल्या पाच वर्षांत झालेल्या पक्षफुटींमुळे प्रमुख दावेदार पक्षांची संख्या वाढली आहे. महायुती-महाआघाडीच्या समीकरणांमुळे अनेक ठिकाणी इच्छुकांना मुरड घालावी लागत आहे. त्यातच सर्वपक्षीय नेत्यांनी मुले, पत्नी, मुली, सुना, भाऊ अशा घरातल्या घरातच उमेदवारी ठेवण्याची खबरदारी घेतली आहे. ‘निवडून येण्याची क्षमता’ हा ‘निकष’ लावल्याचे सांगत घराणेशाहीला मात्र वारेमाप प्रोत्साहन देण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे काय, असा सवाल आता विचारला जात आहे. भाजपमधून हा असंतोष आता उघडपणे व्यक्त होऊ लागला आहे.
घराणेशाही उदंड
● मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ४५ उमेदवारांच्या यादीत उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा, आमदार लता सोनवणे यांचे पती चंद्रकांत, आमदार चिमणराव पाटील यांचे पुत्र अमोल यांची नावे आहेत.
● मनसेच्या यादीत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेना (ठाकरे) पक्षातून उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे हेही पुन्हा निवडणूक लढवत आहेत.
● भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या मुलीला पक्षाने उमेदवारी दिली तर बबनराव पाचपुते यांच्याऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली.
● भाजपचे गणेश नाईक ऐरोलीतून निवडणूक लढवत असताना त्यांचे पुत्र संदीप शेजारच्या बेलापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या तिकिटावर लढणार आहेत. ● राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात छगन भुजबळ हे निवडणूक लढवत असून त्यांचे पुत्र पंकज यांना गेल्याच आठवड्यात विधान परिषदेचे सदस्यत्व देण्यात आले. आता भुजबळांचे पुतणे समीर हेही नांदगावमधून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. नवाब मलिक आणि सना मलिक हे पितापुत्रीही निवडणूक लढवू इच्छितात.