भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई मेट्रो ३ वरून महाविकासआघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “मविआ सरकारने मुंबई मेट्रो ५ वर्षे मागे टाकली. त्यांच्यामुळे मेट्रो ३ ची किंमत १०,००० कोटी रुपयांनी वाढली आहे. हे पाप घोटाळेबाज सरकारचं आहे,” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. ते मंगळवारी (१२ जुलै) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
किरीट सोमय्या म्हणाले, “मेट्रो कारशेडविरोधात पुन्हा आरे कॉलनीत आंदोलन करणं हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. मी महाविकासआघाडी सरकारची कागदपत्रं माध्यमांसमोर ठेवली आहेत. एमएमआरडीए आणि त्यांची कंसल्टन्ट सिट्राने तीन कारशेड एकाच ठिकाणी होऊ शकत नाही, असं सांगितलंय. त्यामुळे लोकांची दिशाभूल करून मुंबईची मेट्रो ५ वर्षे मागे टाकणं आणि मेट्रो ३ ची किंमत १०,००० कोटी रुपयांनी वाढवणं हे पाप घोटाळेबाज सरकारने केलं होतं.”
“आता आम्हाला सुधारण करायची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकर निर्णय घेतला. त्यांनी लवकर काम सुरू करण्यास सांगितलं. दोन वर्षात मुंबईत पाच मेट्रो धावत असणार आहे. जेव्हीएलआर मेट्रो योगेश्वरी विक्रोळी लिंक रोड या मेट्रोसाठी कांजुरला मेट्रो कारशेड तयार करता येणार का ही चाचपणी आधीच झाली होती. फडणवीस सरकारने यासाठी विचार करण्यास मुभा दिली होती,” असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.
हेही वाचा : फडणवीसांकडे तक्रार जाताच किरीट सोमय्यांचा बदलला सूर? उद्धव ठाकरेंबाबत विचारलेल्या प्रश्नावर दिलं भलतंच उत्तर
“आरे कारशेड कांजुरला येऊच शकत नाही हा एक भाग, एकाच ठिकाणी तीन कारशेड होऊ शकत नाही हा दुसरा भाग आणि एका जागेसाठी कमी जागा लागणार आहे. त्यामुळे त्यावर मार्ग निघू शकला असता. त्यावर विचार करता येईल. मात्र, आरे कारशेडचं काम पुन्हा सुरू होणार आहे,” असंही सोमय्या यांनी नमूद केलं.