भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांची माफी मागितलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार नवाब मलिक समीर वानखेडे यांच्या कुटुंबावर चिखलफेक करत आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. तसेच यासाठी संपूर्ण महाराष्ट्र तुमची माफी मागतो, असंही म्हटलं. ते एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किरीट सोमय्या म्हणाले, “समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांच्याशी मी स्वतः बोललो. मी त्यांची क्षमा मागितली आहे. सर्व महाराष्ट्र त्यांची माफी मागतो. ठाकरे सरकारने नवाब मलिक यांच्या मार्फत दररोज उठून त्यांच्या कुटुंबावर चिखलफेक केलीय. हे सर्व शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार सुरू आहे. समीर वानखेडे यांचं पहिलं लग्न, दुसरं लग्न, तू दलित आहे की मुस्लीम आहे? ठाकरे सरकार त्यांचा बाप काढतायेत. त्याबद्दल मी क्रांती रेडकर यांची क्षमा मागितली. तसेच सर्व महाराष्ट्र त्यांच्यासोबत उभा आहे असंही सांगितलं.”

“मलिक, ठाकरे, पवार मुंबई हायकोर्टात गप्प का होते?”

किरीट सोमय्या म्हणाले, “१२ दिवस महाविकासआघाडीचा कॅबिनेट मंत्री एवढा चिखल उडवतोय. त्या क्रुझबाबत पैशांचा व्यवहार झाला असेल तर उच्च न्यायालयात याविषयी याचिका दाखल आहे. शाहरूख खानने नकार दिला तर नवाब मलिक, उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांनी प्रतिज्ञापत्र दाखल करायला हवं होतं. अशाप्रकारे चिखलफेक करून एखाद्याचं व्यक्तिगत आयुष्य बिघडवून त्यांना काय साधायचं आहे? देव त्यांना क्षमा करो.”

“पवारांनी पेड मीडियाचा वापर करून आयटी-ईडी कारवाईची चर्चा वानखेडेंवर नेली”

“शरद पवार यांनी पेड मीडियाचा वापर करून माध्यमातील चर्चा समीर वानखेडे दलित आहेत की मुस्लीम आहेत यावर नेली. परंतू आम्ही घोटाळेबाजांना सोडणार नाही. आयकर विभागानंतर ईडी चौकशी करत होती. आम्हीही अनेक पुरावे दिले होते. आयटीला देखील अनेक गोष्टी सापडल्या. १०५० कोटी रुपयांची बेनामी संपत्ती प्रकरणी आता ईडी पण मागे लागलीय,” असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.

“विलासराव देशमुख यांनी शेतकऱ्यांचे कारखाने हडपले”

किरीट सोमय्या यांनी यावेळी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावरही आरोप केले. ते म्हणाले, “मी लातूरनंतर आता नांदेडला जाणार आहे. लातूरमध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी शेतकऱ्यांचे कारखाने हडप करण्याची मोहिम सुरू केली त्याविषयी माझ्याकडे कागदपत्रे आहेत. सोमवारी (१ नोव्हेंबर) लातूरचे भाजपा आमदार संभाजीराव निलंगेकर यांच्यापासून अन्य लोकांसोबत आम्ही ईडीकडे तक्रार दाखल करणार आहे. ईडीला कागदपत्रे आणि पुरावे देणार आहोत.”

“सर्व पुरावे आहेत, तर ते मुंबई उच्च न्यायालयात गप्प का बसले?”

“शरद पवार, उद्धव ठाकरे, नवाब मलिक यांच्याकडे हे सर्व पुरावे आहेत, तर ते मुंबई उच्च न्यायालयात गप्प का बसले आहेत? असा प्रश्न महाराष्ट्रातील साडेबारा कोटी लोक विचारत आहेत. त्यांना केवळ विषय बदलायचा आहे. अजित पवार यांच्यावर ११ दिवस आयटीची धाड सुरू होती, आता ईडीची सुरू झालीय. या विषयावरून लक्ष हटवण्यासाठी त्यांचं नाटक सुरू आहे,” असा आरोप सोमय्यांनी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kirit somaiya apologies kranti redkar over allegation on sameer wankhede pbs