सध्या महाराष्ट्रात भाजपा मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या जवळ जाताना दिसत आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये मात्र राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध होत आहे. याबाबत भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांना उत्तर प्रदेशात राज ठाकरे यांना का विरोध होतो असा प्रश्न विचारण्यात आला. यावर किरीट सोमय्या यांनी राम मंदिर अयोध्येचं असो की उल्हासनगरचं सर्वांना रामाचं दर्शन घेण्याचा अधिकार आहे, असं मत व्यक्त केलं. ते उल्हासनगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
किरीट सोमय्या म्हणाले, “राम हा हिंदुस्थानातील असा देव आहे की प्रत्येकजण रामराज्य आणायचा प्रयत्न करतो. मात्र, उद्धव ठाकरे रामभक्त हनुमान यांचा हनुमान चालिसा म्हणणाऱ्याला राजद्रोह म्हणतात. तसेच राजद्रोहासाठी तुरुंगात टाकतात. आमचं स्पष्ट मत आहे की अयोध्येला रामाचं दर्शन करण्यासाठी ज्यांना जायचं असेल त्यांना दर्शन करायला मिळालं पाहिजे.”
“सर्वांना रामाचं दर्शन घेण्याचा अधिकार आहे”
“राम मंदिर अयोध्येचं असो की उल्हासनगरचं सर्वांना रामाचं दर्शन घेण्याचा अधिकार आहे. रामाच्या शरणात जो जातो ते मंजूर आहे, मात्र उद्धव ठाकरेंनी एक नेता अयोध्येला जात असताना लगेच आपल्या मुलाला अयोध्येला पाठवून दिलं. त्याचवेळी त्याच रामाचा भक्त हनुमानाचा चालिसा म्हणणाऱ्याला राजद्रोह म्हणून जेलमध्ये टाकतात,” असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.
“आदित्य ठाकरे यांची ७ कोटी रुपयांची चोरी पकडली, काय कारवाई झाली?”
किरीट सोमय्या यांनी यावेळी ठाकरे कुटुंबावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, “आदित्य ठाकरे यांची ७ कोटी रुपयांची चोरी पकडली गेली आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी काय केलं? रश्मी उद्धव ठाकरे यांचा १९ बंगल्यांचा घोटाळा बाहेर आला, त्यावर काय केलं? उद्धव ठाकरे यांच्या मेव्हुण्याची साडेसहा कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली, काय केलं? या सर्व प्रश्नांची उत्तरं उद्धव ठाकरे यांनी द्यावीत.”