भाजपाचे नेते किरिट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर घोटाळ्यांचा आरोप केला. तसेच दसऱ्या निमित्त यातील २४ घोटाळ्यांचा पुतळा दहन करण्याची घोषणा केली. यानंतर मुंबई महानगरपालिकेने किरिट सोमय्या यांच्या कार्यालयात घुसून पुतळा हटवला. यावर सोमय्या यांनी सडकून टीका केली. ही ठाकरे सरकारची दादागिरी आहे. पुतळा जाळला तर जनतेत जागृती होऊन सरकारचं दहन होईल असं ठाकरे पवारांना वाटतं, असाही दावा सोमय्या यांनी केला. तसेच काहीही झालं तरी ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांचा पुतळा जाळल्याशिवाय राहणार नाही, असं आव्हानही सोमय्या यांनी दिली.

किरिट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “पुन्हा ठाकरे सरकारची दादागिरी. आम्ही आज सायंकाळी ५ वाजता घोटाळ्याच्या राक्षसाचा पुतळा दहन करणार आहोत. आत्ता दुपारी १ वाजता पोलीस आणि महापालिका अधिकारी माझ्या कार्यालयात येवून पुतळा ताब्यात घेत आहे. ठाकरे सरकार खासगी सोसायटीमध्ये खासगी कार्यालयात घुसून घोटाळ्याचा रावण राक्षसाचे अपहरण करीत आहे.”

“…तर खरंच ठाकरे सरकारचं दहन होईल असं त्यांना वाटतंय”

“ठाकरे आणि पवार ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांचा पुतळा पाहू शकले नाही. त्यांनी जे घोटाळे केलेत त्याचं प्रतिक म्हणून तो पुतळा होता. मात्र, असं केलं तर जनतेत याविषयी आणखी जागृती येईल आणि खरंच ठाकरे सरकारचं दहन होईल असं त्यांना वाटतंय. हा पुतळा काढण्यासाठी कोणतीही कायदेशी प्रक्रिया केली नाही, आदेश नाही, कलम नाही, पोलीस जबरदस्ती माझ्या कार्यालयात घुसले आणि दादागिरी करायला लागले,” असा आरोप सोमय्या यांनी केला.

“ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांचा पुतळा जाळल्याशिवाय राहणार नाही”

“मुंबई महानगरपालिकेचं कोणतंही लेटर नाही, तरी त्यांच्या नावाने अधिकारी घुसले. मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना आव्हान देतो की घोटाळेबाज ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांचा पुतळा जाळल्याशिवाय मी राहणार नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.

नेमकं काय झालं?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्या नीलम नगर कार्यालयाबाहेर ‘भ्रष्टाचाराचा रावण’ दहनाचा कार्यक्रम संध्याकाळी साडेचारच्या दरम्यान ठेवला होता. यासाठी आघाडी सरकारच्या काळात घोटाळा झाल्याचा आरोप करत अशा २४ घोटाळ्यांचा उल्लेख या पुतळ्यावर करण्यात आला होता. मात्र, दुपारच्या दरम्यान पालिकेच्या पथकाने किरीट सोमय्या यांच्या कार्यालयाबाहेरील हा पुतळा हटवला.

सोमय्यांच्या मुलाची पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांसोबत झटापट

यावेळी किरीट सोमय्या यांचा मुलगा आणि नगरसेवक नील सोमय्या यांची पोलीस आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत झटापट देखील झाली. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला धक्काबुक्की केली असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. दरम्यान घटनास्थळावरून हा पुतळा हटवल्यानंतर पोलीस आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांची टीम रवाना झाली. परंतु कुठल्याही परिस्थितीत रावण दहनाचा कार्यक्रम करणारच आणि दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही झालीच पाहिजे, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

Story img Loader