भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकारपरिषद घेत परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. दापोलीतील रिसॉर्ट प्रकरणावरून बोलताना किरीट सोमय्या यांनी “अनिल परब हे लवकरच ऑर्थररोड तुरुंगात अनिल देशमुखांचे सख्खे शेजारी बनणार असल्याचं सांगितलं.
पत्रकारपरिषदेत बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, “कोविड काळात रत्नागिरीतील दापोलीत समुद्र किनाऱ्यांवर जे अनधिकृत, पंचातारांकीत, १७ हजार ८०० स्क्वेअरफुटाचं जे रिसॉर्ट बांधलं गेलं. ज्याचं बाजारमूल्य २५ कोटी रुपये आहे. संपूर्ण राज्यात लॉकडाउन घोषित केलेलं असताना, मंत्री अनिल परब हे स्वत: ते रिसॉर्ट बांधत होते. आता ते रिसॉर्ट पाडण्याचा आदेश मोदी सरकारने आज दिला आहे. १७ डिसेंबर रोजी नोटीस पाठवण्यात आली होती आणि काल(३१ जानेवारी) हे रिसॉर्ट सीआरझेड मध्ये नो डेव्हलपमेंट झोनमध्ये आहे. म्हणून ते ताबडतोब पाडण्यात यावं, पूर्वासारखी जमीन करावी. असा आदेश केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहनमंत्री आदित्य ठाकरे यांनी करायची आहे.”
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना खुलं आव्हान –
तसेच, “जसं १२ आमदारांच्या बाबतीती सर्वोच्च न्यायालायाला आम्ही धुडकावून लावू. मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना परत खुलं आव्हान देतो. या निर्णायाला देखील तुम्ही धुडकावून लावा. कायदा असा आहे की निर्णायाची अंमलबजावणी राज्य सरकारने करायची आहे. आता हा रिसॉर्ट ताबडतोब पाडण्यात यावा. अशी आमची मागणी आहे. ठाकरे सरकार या संदर्भात काय करणार? याची पाहणी करण्यासाठी सोमवारी मी दापोलीला जाणार.” असल्याचही सोमय्या यांनी यावेळी सांगितलं.
अनिल परब एक नंबरचे खोटारडे आहेत –
याचबरोबर, “केवळ एवढच नाही. रिसॉर्ट तर पाडायचा आहेच, पण त्याचबरोबर फसवणुक, लबाडी, पर्यावरण कायद्याचा भंग यासाठी अनिल परब आणि सहकाऱ्यांवर आता फौजदारी कारवाई देखील करण्यात येणार आहे. अनिल परब एक नंबरचे खोटारडे आहेत. गेले काही दिवस ते नाटक करत आहेत की माझा या रिसॉर्टशी काय संबंध? पण मी सांगू इच्छितो की २० मार्च २०२० रोजी ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात लॉकडाउन घोषित केला. २३ मार्च पंतप्रधानांनी देशात लॉकडाउन घोषित केला. त्या दिवशी महावितरणला स्वत:च्या स्वाक्षरीनिशी अर्ज केला की, “माझे स्वत:च्या मालकीचे मौजे मुरूड, गट क्रमांक ४४६ घर नंबर १०७४ या जागेत इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तरी मला आपल्या कार्यालयातून थ्री फेज ५.७५ वाणीज्य याचं वीजमीटर बांधकामासाठी द्यावे.” काय उद्धव ठाकरे यांचे कारनामे आहेत बघा. जनतेला घरी बसवलं आणि उद्धव ठाकरेंचे सीईओ पंचतारांकीत रिसॉर्ट बांधत आहेत आणि खोटारडे अनिल परब म्हणतात की माझा या रिसॉर्टशी काय संबंध? अनिल परब तुम्ही २६ जून २०१९ रोजी दापोली तालुक्यातील मुरूड ग्रामपंचायतीच्या सरपंचास मोजणी करून कर आकारणेबाबत पत्र लिहिलं होतं. यावर त्यांची स्वाक्षरी देखील आहे.” असं देखील किरीट सोमय्या यांनी यावेळी दाखवलं.
अनिल परबच्या विरोधात फौजदारी दावा देखील दाखवल केला जाणार –
तर, “अशा प्रकरे फसवणुक करणाऱ्या मंत्र्यांना आम्ही सोडणार नाही. अनिल परबच्या विरोधात फौजदारी दावा देखील दाखवल केला जाणार आहे. मिलिंद नार्वेकरचा बंगला तुटला, अनिल परबचा रिसॉर्ट तुटणार. मी उद्या दिल्लीला जात आहे. आता आदेश निघाला आहे, आयकर विभाग, ईडी या सगळ्यांच्या भेटी घेणार आहे. की हा जो रिसॉर्ट बांधला २५ कोटींची संपत्ती ती अनिल परब यांनी आपल्या दाखवली आहे का? त्या बांधकामाचा खर्च कोणी केला? यासाठी पैसे कुठून आले आहेत? त्या अनिल देशमुख सोबत जे वसुलीचा धंदा करायचे, त्यातला हा पैसा आहे का? की बेनामी संपत्ती आहे, याची पण चौकशी झाली पाहिजे. मला विश्वास आहे येत्या काही महिन्यात अनिल देशमुखचे सख्खे शेजारी म्हणून अनिल परबला राहण्याची संधी उपलब्ध होणार.” असा सूचक इशारा यावेळी किरीट सोमय्या यांनी दिला.