भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीच्या सजावटप्रकरणी जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ताबडतोब जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. याशिवाय बीएमसीचा इंजिनियर आणि विश्वस्तांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली. ते गुरुवारी (८ सप्टेंबर) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
किरीट सोमय्या म्हणाले, “मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मुंबई आयुक्तांनी ताबडतोब जाहीर माफी मागावी. ज्या महानगरपालिका इंजिनिअरने, विश्वस्तांनी दहशतवादी याकुब मेमनला शहीद बनवण्याचं पाप केलं त्यांच्यावर तातडीने फौजदारी कारवाई करावी. त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत.”
“१९९३ च्या बॉम्बस्फोटात वेदना सहन कराव्या लागलेले अनेक लोक आहेत. त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत,” असं किरीट सोमय्यांनी सांगितलं.
किरीट सोमय्यांनी शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंचा तिसरा हात रविंद्र वायकर आहे. त्यांनी एक कारनामा केला आहे. मुंबई पालिकाने मुंबईतील जोगेश्वरीच्या २००० वर्षांपूर्वीच्या महाकाली गुफा आणि तेथे जाणाऱ्या रस्त्यासाठी ५०० कोटी रुपयांचे बांधकामाचे अधिकार एका बिल्डरला दिले. हा बिल्डर अविनाश भोसले हा आहे. तेही बहुतेक तुरुंगातच आहेत.”
“ठाकरेंचा तिसरा हात रविंद्र वायकरांचा घोटाळा बाहेर येत आहे”
“उद्धव ठाकरेंचा उजवा हात असलेले संजय राऊत तुरुंगात गेले. डावा हात अनिल परबांचा रिसॉर्ट तोडला जाणार आहे. फौजदारी प्रक्रिया सुरू झाली आहे. एक नाही तर तीन तीन गुन्हे दाखल झालेत. म्हणजे तेही तुरुंगात जाणार आहेत. आता तिसरा हात रविंद्र वायकर आहे. त्यांचा घोटाळा बाहेर येत आहे. त्या सरकारची कृपा असणारा चौथा हात अविनाश भोसलेही तुरुंगात आहे,” असं म्हणत सोमय्यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार टीका केली.