भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना पुढील ४८ तासात माफी मागितली नाही, तर आम्ही कायदेशीर कारवाई करू, असा इशारा दिलाय. किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेघा सोमय्या यांनी विक्रांत घोटाळ्या प्रकरणी बदनामी केल्याचा आरोप करत मानहानी खटला दाखल करण्याबाबत नोटीस दिली आहे. किरीट सोमय्या सोमवारी (२ मे) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
किरीट सोमय्या म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ‘महाडरपोक’ लोक आहेत. मागील ३ महिन्यात त्यांनी १२ वेळा स्टंटबाजी केली. ७,५०० कोटी अमित शाहांना दिले, ४५० कोटी जुहूची जमीन असे आरोप केले. त्यांना एका आरोपावरही कागदपत्र सादर करता आले नाही. मी उद्धव ठाकरे आणि संजय पांडे यांना आव्हान देतो. माझ्यावर उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यामार्फत ५७ कोटी रुपयांच्या विक्रांत घोटाळ्याचा आरोप केला.”
“पुढील ४८ तासात माफी मागितली नाही तर आम्ही…”
“नील सोमय्यांच्या कंपनीत ४ बिल्डरने मनी लाँड्रिंग केली, असा आरोप केला. आता उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना कागदपत्र आणि खात्यांची माहिती घेऊन पोलिसांकडे पाठवावं. ते भित्रे लोक आहेत. त्यामुळेच माझ्या पत्नीने त्यांना जाणीवपूर्वक नोटीस दिली. खोट बोलून विरोधी पक्षातील नेत्यांना जेलमध्ये टाकणाऱ्यांचा पर्दाफाश केला पाहिजे. त्यांनी पुढील ४८ तासात माफी मागितली नाही तर आम्ही कायदेशीर कारवाई करू,” असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला.
“माझ्यावर ५७ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, पण ५७ पैशांचा पुरावा दिला नाही”
किरीट सोमय्या पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि संजय राऊत भित्रे आहेत. ते दुसऱ्यांना तक्रार करायला लावतात. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांमार्फत आरोप केले. किरीट सोमय्या आणि नील सोमय्याला जेलमध्ये टाकायला निघाले होते. माझ्यावर ५७ कोटी विक्रांत घोटाळ्याचा आरोप केला, पण संजय राऊत यांनी ५७ पैशांचा पुरावा दिला नाही. आता त्यांनी ईओडब्ल्यूमध्ये जावं आणि तिथं कागदपत्रे द्यावेत. आता संजय राऊत कागदपत्रे का देत नाहीत. म्हणून हे भित्रे लोक आहेत. ते त्यांचा भ्रष्टाचार उघड होतोय आणि त्यांची संपत्ती जप्त होणार म्हणून घाबरून काहीही आरोप करत आहेत.”
हेही वाचा : “बाळासाहेब भोळे होते, मी भोळा नाही धूर्त आहे, फसणार नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा
“उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना त्यांची जागा दाखवून देणार”
“आता मी आव्हान देतो. आता मी मुंबई पोलिसांना सांगणार आहे की त्यांनी संजय राऊत यांना बोलवावं आणि ५७ कोटी घोटाळ्याची कागदपत्रे त्यांच्याकडून घ्यावीत. म्हणून माझी पत्नी प्राध्यापक मेधा सोमय्या यांनी नोटीस दिली आहे. ‘लाथों के भूत बातों से नही मानते’. दोन दिवसात माफी मागितली नाही, तर आम्ही त्यांच्यावर बदनामी, मानहानीचा दावा दाखल करणार आहोत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे,” असंही किरीट सोमय्या यांनी सांगितलं.