विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांची त्यांच्या नीलम नगर मुलुंड येथील कार्यालयात जाऊन भेट घेतली. या दोघांमध्ये १५ मिनिटे चर्चा देखील झाली. किरीट सोमय्या यांच्या कोरलाई दौऱ्यानंतर फडणवीस यांनी किरीट सोमय्या यांच्यासोबत या प्रकरणावर चर्चा केली. महाराष्ट्राची संपूर्ण जनता तुमच्या सोबत आहे. महाराष्ट्र आपल्याला घोटाळे मुक्त करायचा आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. तसेच पोलिसांवर विश्वास ठेवून चालणार नाही, मोदींनी दिलेल्या सीआयएसएफच्या संरक्षणाचे नियम पाळा, असा सल्लाही दिल्याचं सोमय्यांनी यावेळी सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किरीट सोमय्या म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घोटाळ्यांसंबधी चर्चा झाली. याशिवाय गेले काही दिवस माझ्यावर ज्या पद्धतीने हल्ले होत आहेत त्यावरही चर्चा झाली. पुण्यानंतर काल कोरलईला देखील अधिकृत वेळ घेऊन गेलेलो असताना देखील शिवसेनेचे गुंड तिथे पोहचली कशी? त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट सांगितलं, की तुम्हाला सीआयएसएफ आणि मोदी सरकारने दिलेले सुरक्षेचे नियम पाळावे लागतील. पोलिसांवर खालच्या सुरक्षेवर विश्वास ठेवून चालणार नाही.”

“देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की गतीने पुढे जा”

“देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की गतीने पुढे जा, महाराष्ट्र भाजपा आणि पूर्ण महाराष्ट्राची जनता तुमच्यासोबत आहे. काहीही, केव्हाही अडचण वाटली तर मला सांगा, परंतू महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करायचं आहे,” असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.

“मुख्यमंत्री पद वाचवण्यासाठी स्वतःच्या पत्नीचे १९ बंगले गायब केले”

किरीट सोमय्या म्हणाले, “महाराष्ट्राच्या जनतेची मान खाली गेली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःचं मुख्यमंत्री पद वाचवण्यासाठी स्वतःच्या पत्नीचे १९ बंगले गायब केले. महाराष्ट्राच्या जनतेची यामुळे मान झुकली. हा मुख्यमंत्री कसा? एका रात्रीत बायकोचे १९ बंगले तोडले, गायब केले. बाकीच्या गुंडागर्दीबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की पोलिसांचं काम कायदा सुव्यवस्था राखणं आहे. मात्र, शिवसेनेच्या दादागिरीसमोर प्रशासन देखील झुकत आहे.”

हेही वाचा : “रिश्ते में हम आपके बाप लगते है आणि बाप काय असतो ते…”, संजय राऊतांचा भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून सोमय्यांवर निशाणा!

“महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेचा आशीर्वाद आहे. महाराष्ट्र भाजपाचा प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता महाराष्ट्र घोटाळेमुक्त करण्यासाठी मैदानात आलाय,” असंही सोमय्यांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kirit somaiya inform about suggestion by devendra fadnavis about his security after attack pbs