भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओवरून विधानपरिषदेतही गोंधळ झाला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना ( ठाकरे ) गट आमदार अनिल परब यांनी याप्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी घोषणा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राजकारणात अनेकवेळा असे प्रसंग येतात की त्यात माणसाचं पूर्ण राजकीय आयुष्य आणि केलेली पुण्याई पणाला लागते. पण, समोर आलेल्या प्रकरणातील काही तक्रारी असतील, तर त्याची चौकशी आम्ही करू. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही.”

हेही वाचा : “यापुढे बरंच काही…”, किरीट सोमय्यांच्या कथित व्हायरल व्हिडीओनंतर संजय राऊतांचं सूचक ट्वीट

“प्रकरण दाबले जाणार नाही”

“महिलेची ओळख सांगता येत नाही. तपासासाठी पोलिसांना महिलेची ओळख दिली जाईल. पोलीस कायद्याच्या चौकटीत राहून महिलेची ओळख पटवतील. महिलेची ओळख आपण जाहीर करत नाही. त्यामुळे ती जाहीर करण्याचा प्रश्नच येत नाही. अशा प्रकारचे कोणतेही प्रकरण दाबले किंवा लपवले जाणार नाही,” अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

“सोमय्यांनी पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. याची अतिशय सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल,” असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

हेही वाचा : “किरीट सोमय्या नग्न झाले, पेन ड्राईव्ह घेऊन सभागृहात…”, अंबादास दानवेंचा हल्लाबोल

देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात किरीट सोमय्या काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात किरीट सोमय्या म्हणाले, “देवेंद्रजी, आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडीओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली. या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत. अशाप्रकारच्या अनेक व्हिडीओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे.”

“मी अनेक महिलांवर अत्याचार केल्याचे दावे केले जात आहेत”

“मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडीओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी,” अशी विनंती किरीट सोमय्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली होती.

“सर्व व्हिडीओंची सत्यता तपासून चौकशी करावी”

“ही व्हिडीओ क्लिप किंवा अन्य अशा व्हिडीओ क्लिप (जर कोणाकडे असल्यास किंवा प्रदर्शित झाल्यास) या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशीही करावी, अशी मी आपणास विनंती करीत आहे,” असंही सोमय्यांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kirit somaiya nude video case devendra fadnavis announce police inquiry ssa
Show comments