राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आज पुन्हा एकदा ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी ११ जानेवारी रोजी मुश्रीफ यांच्या कोंढव्यातील नातेवाईकांच्या निवासस्थानी तसेच गणेशखिंड रस्त्यावरील एका कार्यालयात इडीच्या पथकाने छापा टाकला होता. दरम्यान, या कारवाईवरून विविध राजकीय प्रतिक्रिया येत असताना भाजपा नेते किरीट सोमय्या यांनीही याबाबत भाष्य केलं आहे. ते टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलते होते.
हेही वाचा – Video: मोठी बातमी! हसन मुश्रीफांच्या घरी पुन्हा ईडीचा छापा; दीड महिन्यातील दुसरी कारवाई
काय म्हणाले किरीट सोमय्या?
“दोन वर्षांपूर्वी मी कोल्हापूरला जायला निघालो होते. तेव्हा उद्धव ठाकरे आणि मुश्रीफ यांनी मला थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हाच जनतेच्या लक्षात आलं होतं की मुश्रीफ यांनी कोट्यवधीचा भ्रष्टाचार केला आहे. आयकर विभाग, सहकार मंत्रालय आदींना या घोटाळ्याची चौकशी केली आहे. हा घोटाळा १०० कोटींच्या घरात जातो आहे, त्यामुळे याची चौकशी होणारच आहे. मुश्रीफांना याचा हिशोब द्यावाच लागेल”, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली.
“मुश्रीफ म्हणाले माझ्या कारखान्यात हजारो शेतकरी भागीदार आहेत. पण हे सर्व खोटं आहे. मुळात शेतकऱ्यांकडून ५० हजार घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आली. ४० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या नावाने जमा केले, त्या पैशांचं काय झालं? मी कोल्हापूरला गेलो, तेव्हा शेकडो शेतकरी येऊन मला भेटले. शेतकऱ्यांनी यासंदर्भात तक्रार केली होती. त्याचा तपास सुरू आहे”, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – “काहीही करून हसन मुश्रीफ यांना अडकवायचं आणि..” जयंत पाटील यांची ईडीच्या छाप्यानंतर प्रतिक्रिया
“हसन मुश्रीफ यांच्या परिवाराने आयकर विभागाकडे सेटलमेंटसाठी अर्ज केला होता. जर तुम्ही कर चोरी केली नव्हती, मनी लॉनड्रींग केली नव्हती, तर तुम्ही सेटलमेंटसाठी अर्ज का केला? आधी चोरी केली, त्यानंतर चोरी पकडल्या गेल्याने मी सेटमेंट करतो असं म्हणाले, असं कसं चालेल? त्यामुळे त्यांना हिशोब द्यावाच लागेल”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.