करोना काळात ऑक्सिजन प्रकल्प कंत्राटात सहा कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात बुधवारी (२२ नोव्हेंबर) गुन्हा दाखल करण्यात आला. मे. हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचे रोमिन छेडा, महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. दरम्यान, हा गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटातील आमदार आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
किरीट सोयम्या म्हणाले, आदित्य ठाकरे आणि रोमिन छेडा यांनी संगन्मताने हा ऑक्सिजन घोटाळा केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करावी यासाठी मी १० ऑगस्ट २०२१ रोजी पोलिसांत तक्रार केली होती. याच रोमिन छेडाला मुंबईच्या राणीबागेत पेंग्विन आणण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं. परंतु. त्यावर विरोध झाल्यानंतर रोमिन छेडाला ब्लॅकलिस्ट केलं होतं. परंतु, त्याच रोमिन छेडाच्या कंपनीला उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या १३ रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट सुरू करण्याचं कंत्राट दिलं. त्यासाठी १४० कोटी रुपये देण्यात आले. रोमिन छेडा याने पैसे घेतले आणि केवळ ३८ कोटींचे प्लान्ट उभारले. तसेच १०२ कोटींचा ऑक्सिजन चोरण्याचं पाप केलं. यात ठाकरे गटाचे नेते भागीदार आहेत. या सगळ्यांना उद्धव ठाकरे यांचा आशीर्वाद होता.
करोना काळात शेकडो रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला त्याची जबाबदारी उद्धव ठाकरे घेणार का? असा प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. सोमय्या म्हणाले, रोमिन छेडाच्या कंपनीला आदित्य ठाकरे यांनी महापालिकेची ५३ प्रकारची कंत्राटं दिली आहेत. छेडा याला मुंबईत १३ प्लान्ट बसवण्याचं काम दिलं होतं. परंतु, त्याने ३८ कोटी रुपयांमध्ये दिल्लीतल्या कंपनीकडून सेकेंड हँड वस्तू खरेदी केल्या आणि प्लान्ट बसवले. यातले काही प्लान्ट त्यावेळी सुरू झालेच नाहीत. हे प्लान्ट एक वर्षाने सुरू झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.
हे ही वाचा >> मुंबई : हवालदाराला विवाहित महिलेशी प्रेम प्रकरण भोवलं, वरिष्ठांनी केली मोठी कारवाई
किरीट सोमय्या म्हणाले, ज्यांनी रोमिन छेडा याला कंत्राट दिलं त्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांची आणि पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची चौकशी झाली पाहिजे. मी यासंदर्भात आयकर विभाग आणि सक्तवसुली संचालनालयाकडे तक्रार केली आहे. मुंबई पोलीस आता याप्रकरणी शोध घेणार आहेत.