Kirit Somaiya मुंबईतल्या दादरमधील ८० वर्षे जुनं मंदिर पाडण्यासाठी रेल्वेने नोटीस बजावल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत दिली. तसंच त्यांनी भाजपाला हिंदुत्वाचा विसर पडला आहे का? असा सवाल केला. यावरुन उद्धव ठाकरेंवर टीका होते आहे. नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख जनाब असा करत त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये म्हटलं आहे. तर किरीट सोमय्यांनी ( Kirit Somaiya ) रेल्वे प्रशासनाला एक पत्र लिहिलं आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. इस्कॉनचं मंदिर जाळण्यात आलं. त्यांच्या प्रमुखांना अटक झाली तरीही गप्प आहोत. हिंदूंवर अत्याचार होऊनही गप्प आहोत. माझी तमाम हिंदूंतर्फे पंतप्रधान मोदींना विनंती आहे की जसं आपण एका फोनवर युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं तसंच बांगलादेशात जे काही हिंदूंवर अत्याचार होत आहेत त्याबद्दल भूमिका घ्यायला पाहिजे. नुसतं इथे बटेंगे, कटेंगे, फटेंगे वगैरे करुन उपयोग नाही. जिथे काही नाही तिथे छाती फुगवून दाखवू नका. जिथे अत्याचार होत आहेत त्यांना धमक दाखवण्याची गरज आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते.

देवेंद्र फडणवीस यांनाही केला सवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजवटीत हनुमानाचं मंदिर पाडलं जाण्याची नोटीस येते आहे. सिडकोतल्या मंदिरावर कुणाचा तरी डोळा आहे. हल्ली कुणाला सगळं मिळतं तुम्हाला माहित आहेच. बांगलादेशात मंदिर जाळलं जातं आहे. हिंदूंवर बांगलादेशात अत्याचार होत आहेत तरीही जे हिंदुत्व हिंदुत्व करतात त्या भाजपाची हिंदुत्वाची व्याख्या आणि आकारऊकार तरी काय? हे मला उत्तर मिळालं पाहिजे. निवडणुकीपुरतं फक्त हिंदुत्व भाजपाकडे उरलं आहे का? हिंदू म्हणजे फक्त मतं नाहीत. त्यांना भावना आहेत. आधी हिंदूंना घाबरवायचं आणि मग त्यांची मंदिरंही सेफ नाहीत असं जर असेल तर काय बोलायचं असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते.

हे पण वाचा- Navneet Rana : “जनाब उद्धव ठाकरे तुमची लायकी नाही…”; नवनीत राणा यांची घणाघाती टीका

किरीट सोमय्यांचं पत्र काय?

उद्धव ठाकरे यांनी याबाबत भाष्य केल्यानंतर आता भाजपा नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) यांनी आपली भूमिका मांडली आहे. विशेष म्हणजे सोमय्या यांनी रेल्वे विभागाला तसं पत्र देखील पाठवलं आहे. तसेच “दादरला हनुमान मंदिर पाडण्याच्या नोटीसीचे पुनरावलोकन करण्याचे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी मला दिले आहे. आम्ही ते मागे घेतील असे पाहू. अनेक दशके जुने हनुमान मंदिर पाडता येणार नाही”, असं किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) म्हणाले आहेत. सात दिवसांत हनुमान मंदिर पाडण्यासंबंधीच्या केलेल्या सूचना धक्कादायक आहेत. त्या भागात कुठलाही मोठा प्रकल्प येत नाहीये मग मंदिर पाडण्यासाठी ही नोटीस का? याचा विचार केला जावा असं किरीट सोमय्यांनी ( Kirit Somaiya ) म्हटलं आहे.

Kirit Somaiya Letter to Railway
भाजपा नेते किरीट सोमय्या यांचं रेल्वे प्रशासनाला पत्र (फोटो सौजन्य-भाजपा जनसंपर्क अधिकारी)

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

उद्धव ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीही उद्धव ठाकरेंची लायकी काढली. ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलत आहेत. उद्धव ठाकरे तुमचं हिंदू प्रेम किती बेगडी होतं हे तुमच्या अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात जनतेनं बघितलं. पालघरमध्ये झालेलं साधूंचं हत्याकांड आणि तुमची हिंदूविरोधी भूमिका महाराष्ट्रानं बघितली. अशी टीका बावनकुळेंनी केली आहे.

Story img Loader