माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने मढ मार्वे स्टुडिओ प्रकरणी नोटीस पाठवली आहे. यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्यावर १,००० कोटी रुपयांचा मढ मार्वे स्टुडिओ घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच मुंबई जिल्हाधिकारी व मुंबई महानगरपालिकेला या प्रकरणी ताबोडतोब कारवाईचे निर्देश देण्यात आल्याचीही माहिती दिली.
किरीट सोमय्या म्हणाले, “अस्लम शेख यांनी १ हजार रुपयांचा मढ मार्वे स्टुडिओ घोटाळा केला आहे.या प्रकरणी महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाने अस्लम शेख व त्यांच्या मित्रांना नोटीस पाठवल्या आहेत. मुंबई जिल्हाधिकारी व मुंबई महापालिकेला ताबडतोब कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.”
हेही वाचा : “संजय पांडेंच्या कंपनीने नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या लोकांचे फोन टॅप केले आणि…”; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
किरीट सोमय्या यांनी याआधीही महाविकासआघाडीच्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केलेत. तसेच मोठ्या नेत्यांची नावं घेत ते तुरुंगात जाणार असल्याच्या भविष्यवाणी केल्यात. त्यापैकी राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख, आमदार नवाब मलिक आणि आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत कोठडीत आहेत. आता सोमय्यांच्या निशाण्यावर अस्लम शेख असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता अस्लम शेख यांनाही तुरुंगाची हवा खायला लागणार की काय असे तर्कवितर्क लावले जात आहेत.