भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर महाविकासआघाडीवर हल्लाबोल केलाय. सोमय्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करत कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आरोप केला. बाळासाहेब ठाकरे भाषण द्यायचे की दाऊद आणि शरद पवारांची जोडी महाराष्ट्राची वाट लावणार आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले. ते मुंबईत बोलत होते.
किरीट सोमय्या म्हणाले, “नवाब मलिकांच्या प्रकरणात देशद्रोह आहे त्यामुळे यात एनआयए आहे. परदेशातील व्यवहार निघू शकतात, दाऊदच्या सांगण्यावरून काय काय झालं हे बाहेर येणार आहे.”
“दाऊद आणि शरद पवारांची जोडी महाराष्ट्राची वाट लावणार”
“उद्धव ठाकरे यांचे पिताश्री बाळासाहेब ठाकरे त्यांच्यासोबत मी खाली बसायचो. बाळासाहेब भाषण द्यायचे की दाऊद आणि शरद पवारांची जोडी महाराष्ट्राची वाट लावणार. आता दाऊदच्या जोडीतील एक माणूस उद्धव ठाकरेंचा जोडीदार आहे,” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.
“ते म्हणतात सरन्यायाधीश भाजपाचा आहे”
किरीट सोमय्या पुढे म्हणाले, “शरद पवार, उद्धव ठाकरे आणि त्यांचे माफिया मंत्री हे कोर्टाला शिव्या देतात. अनिल देशमुख जेलमध्ये आहेत. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचा आदेश आहे. ते म्हणतात सरन्यायाधीश भाजपाचा आहे. ही काय भाषा आहे का? त्यांना बोलू द्या. डर्टी डझन ही केवळ १२ नावं नाहीत, तर त्यांचे घोटाळे सिद्ध झाले आहेत. त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू झालीय.”
“असे फडतूस नाटकं, नौटंकी उद्धव ठाकरेंची माणसं करतात”
“मी काय संजय राऊत नाही. चणेवाल्याकडे जाऊन दोन ट्रक रद्दीचे पेपर घेऊन जाणार. किरीट सोमय्याच्या कंपनीच्या एका पार्टनरचं नाव संजय राऊत सांगू शकले नाही. कुठे आहे वाधवान? असे फडतूस नाटकं, नौटंकी उद्धव ठाकरेंची माणसं करतात, आम्ही कागदपत्रांसह सांगतो. आता १२ नेत्यांपैकी पुढचा नंबर कोणाचा ही चिट्ठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना काढू द्या. त्यांना ठरवू द्या कोणत्या नेत्याला आधी तुरुंगात पाठवायचं,” असं म्हणत किरीट सोमय्या यांनी पवार-ठाकरेंना खोचक टोला लगावला.
“देशमुख-मलिकांनंतर तुरुंगात जाण्यासाठी ‘डर्टी डझन’ रांगेत”
किरीट सोमय्या म्हणाले, “मविआचे नेते कितीवेळा असं आंदोलन करणार आहेत? मी आजच डर्डी डझनची यादी जाहीर केली. त्यांच्यावर आधीच तपास आणि कारवाई सुरू आहे. या डर्टी डझनमध्ये अनिल देशमुख, नवाब मलिक या दोघांबाबत निर्णय आला. त्यात अनिल परब आहेत आणि त्यांच्यावर आधीच प्रक्रिया सुरू झालीय. बेनामी रिसॉर्टमध्ये कायदेशीर कारवाई सुरू झालीय.”
“राऊतांच्या धडपडीवरून लक्षात येतं की आता कुणाची बारी”
“संजय राऊत यांच्या धडपडीवरून लक्षात येतं की आता कुणाची बारी आहे. त्यांचे पार्टनर सुजित पाटकर आहेत. कोविड हॉस्पिटल घोटाळा सिद्ध झाला आहे. यात उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि सुजित पाटकरला उत्तर द्यावं लागेल. भावना गवळी यांचा पार्टनर तर आतमध्ये आहे, आईचं नाव आरोपपत्रात आलं. आनंद आडसुळ यांच्याविरोधात आधीच अटक वॉरंट आहे,” असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.
“किती वेळा धरणे धरणार?”
“अजित पवार यांचा जरेंडेश्वर कारखाना केव्हा जप्त होणार याची मी वाट पाहत आहे. हसन मुश्रीफ आधीच संकटात आहेत. प्रताप सरनाईक, रविंद्र वायकर, जितेंद्र आव्हाड यांचा यात समावेश आहे. हे किती वेळा धरणे धरणार?” असा सवालही सोमय्यांनी केला.
सोमय्यांनी जाहीर केलेल्या ‘डर्टी डझन’मध्ये कोणाचा समावेश?
१. अनिल देशमुख
२. नवाब मलिक
३. अनिल परब
४. संजय राऊत
५. सुजित पाटकर
६. भावना गवळी
७. आनंद आडसुळ
८. अजित पवार<br>९. हसन मुश्रीफ
१०. प्रताप सरनाईक
११. रविंद्र वायकर
१२. जितेंद्र आव्हाड
हेही वाचा : “पोलिसांवर विश्वास ठेवून चालणार नाही, CISF ने सांगितलेले…”, देवेंद्र फडणवीस यांचा किरीट सोमय्या यांना सल्ला
“दोन गेले, १० जणांवर कारवाई सुरू”
“मविआचे १२ नेते कारवाईच्या रांगेत आहेत. ते कितीवेळा दबाव आणणार? पत्रकाराने सकाळी विचारलं ‘अब किस की बारी है’ मी म्हटलं चिट्ठी टाकावी लागेल. दोन गेले, १० जणांवर कारवाई सुरू आहे,” असंही सोमय्यांनी म्हटलं.