राज्य सरकारमधील मंत्र्यावर आरोप करणाऱ्या भाजपाच्या किरीट सोमय्या यांनी आता मुंबई महापालिकेकडे लक्ष वळवले आहे.  किरीट सोमय्या यांच्या रडावर आता शिवसेनेचे मुंबई महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आहेत. यशवंत जाधव यांच्याशी संबंधित मोठा घोटाळा लवकरच उघड करणार असल्याची प्रतिक्रिया सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“शिवसेनेसाठी मुंबई महानगर पालिका ही कमाईचे साधन आहे. कोविड काळात यांनी केलेले शेकडो कोटींचे घोटाळे मी आता मुंबईकरांसमोर मांडण्यास सुरुवात करत आहे. लुटायचे कसे यासाठी पवार ठाकरेंनी मंत्रालयामध्ये शिबीर आयोजित केल्याचे दिसते. मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी १५ कोटी रुपये रोख स्वरुपात मनी लॉन्ड्रिंग करणाऱ्या उदय शंकर महावारला दिले आहेत. हे पैसे प्रधान डिलर प्रा. लिमिटेडच्या खात्यात जमा करण्यात आले. या कंपनीचा एक रुपयांचा शेअर आणखी पाच कंपन्यांनी पाचशे रुपये दराने घेतला. हे सर्व बोगस होते. त्यानंतर हे पंधरा कोटी यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबाच्या खात्यामध्ये जमा झाले. त्यानंतर यशवंत जाधव यांनी हे पैसे संयुक्त अरब अमिराती येथे हलवले. त्यामुळे १५ कोटी रुपये रोख यशवंत जाधव यांनी दिले हे स्पष्ट होत आहे,” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

“आता अनिल परब यांचा नंबर लागणार आहे. रिसॉर्ट बांधल्यानंतर ते मालमत्ता कर भरत होते. मात्र आयकर रिटर्नमध्ये रिसॉर्ट दाखवलेच नाही. पण ही सगळी ट्रेनिंग देणारे पवार आणि ठाकरे महापालिकेला का लुटत आहेत? यशवंत जाधव यांच्याबाबत संबधित विभागाकडे आम्ही तक्रारी केल्या आहेत. आयकर विभाग आणि ईडीने याची चौकशी करावी अशी आमची मागणी आहे,” असे किरीट सोमय्या म्हणाले.

दरम्यान, आधी महापालिकेत मोठा घोटाळा झाल्याचे म्हणत किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग केली आहे. आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत. जाधव यांचे पितळ उघडे करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचे म्हटले होते.