Anil parab office: म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. लोकायुक्तांच्या निर्णयाबाबतही आम्ही बोललो. २०१९ मध्ये अनिल परबला नोटीस दिली होती. त्यानुसार ते कार्यालय जवळपास उद्ध्वस्त झालं आहे. इतर काम म्हाडा करणार आहे. अनिल परबचं कार्यालय तुटलं ते वाचवण्यासाठी प्रचंड खटाटोप केला गेला. उच्च न्यायालयात गेले, म्हाडामध्ये सुनावणी सुरू होती. मिलिंद नार्वेकरने स्वतःचा बंगला तोडला, अनिल परबांनी कार्यालय तोडलं आता साई रिसोर्ट राहिलं आहे असा टोला किरीट सोमय्यांनी लगावला आहे. तसंच माफियागिरी पकडली गेल्यावर तो मी नव्हेच असं जर अनिल परब म्हणत असेल तर त्याने ते कोर्टाला सांगावं.
कार्यालयाच्या ठिकाणी जाणार नाही
आज मला अडवण्यात आलं आहे, त्यामुळे मी जाणार नाही. गेली पाच ते सात वर्षे त्या कार्यालयातून अनधिकृत व्यवहार अनिल परब काम करत होता. आता मी त्याच्या रिसोर्टच्या विरोधात मोहीम सुरू करणार आहे. एक गोष्ट चांगली झाली आहे की आजच्या कारवाईच्या निमित्ताने अनिल परब यांना मराठी माणूस आठवला. कार्यालय अनधिकृत होतं, पाडकाम झाल्यावर आता मराठी माणसाचा हवाला दिला जातो आहे. १०० कोटींची सचिन वाझेकडून वसुली करताना यांना मराठी माणूस आठवला नाही. वसुलीसाठी हत्या करताना यांना मराठी माणूस आठवला नाही. हसन मुश्रीफवर ईडीने धाडी घातल्या तेव्हा त्यांना मुस्लिम माणूस आठवला तसा आज याला मराठी माणूस आठवला आहे असा टोलाही किरीट सोमय्यांनी लगावला आहे.
“…तर मी आणि शिवसेना गप्प बसणार नाही”, म्हणत अनिल परब यांचं किरीट सोमय्यांना खुलं आव्हान
अनिल परब म्हणजे मिस्टर नटवरलाल
लोकायुक्तांनी आदेश दिला आहे आणि कारवाई झाली आहे. तिथे जाऊन हे का बोलत नाहीत? अनिल परब म्हणजे मिस्टर नटरवलालसारखे आहेत. जर कार्यालय तुमचं नव्हतं तर मग एवढा आराडा ओरडा का करत आहात? रिसोर्टही माझा नाही असंच अनिल परब म्हणत होता. मात्र घोटाळे पकडल्यावर तो मी नव्हेच म्हणण्यात काही अर्थ नाही असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. लोकायुक्तांच्या सुनावणीत जो निकाल आला होता त्यानुसार काम सुरू आहे. त्यामुळे आता मी तिकडे जाणार नाही असं किरीट सोमय्यांनी सांगितलं आहे तसंच अनिल परब यांना टोला लगावला आहे.
काय म्हटलं आहे अनिल परब यांनी?
सोमवारपासून एक बातमी वृत्तवाहिन्यांवर देण्यात येते आहे. अनिल परब यांचं अनधिकृत कार्यालय तोडलं गेलं. ही इमारत १९६० मध्ये बांधण्यात आली. माझा जन्म याच इमारतीत झाला. या इमारतीत मी लहानाचा मोठा झालो. मी जेव्हा आमदार झालो तेव्हा या इमारती या आता मालकीच्या झाल्या म्हाडाकडे राहिल्या नाहीत असं मला इमारतीच्या लोकांनीच सांगितलं. माझं कार्यालय इथेच होतं. अनेक वर्षे ही जागा मी वापरत होतो. मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा किरीट सोमय्यांनी म्हाडा, लोकायुक्त यांच्याकडे जाऊन माझं अनधिकृत कार्यालय आहे हे भासवून मला नोटीस द्यायला लावली असं अनिल परब यांनी सांगितलं. किरीट सोमय्याने बिल्डर्सकडून सुपारी घेतली आहे असाही आरोप अनिल परब यांनी केला आहे.
आज प्रत्येकाच्या मनात ब्लॅकमेलिंगची भीती
आज प्रत्येकाच्या मनात ही भीती आहे की या ऑर्डरचा फायदा घेऊन ब्लॅकमेल केलं जाईल असं वाटतं आहे. आम्ही म्हाडालाही याबाबतचा जाब विचारणार आहोत असंही अनिल परब आहे. २० वर्षांपूर्वीचं एक प्रकरण अजून म्हाडाकडे पेंडिंग आहे. किरीट सोमय्यांना माझं आव्हान आहे नारायण राणेंचं घर तोडण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. माझ्यासोबत किरीट सोमय्या ती तोडक कारवाई बघायला येणार का? असाही खोचक प्रश्न अनिल परब यांनी विचारला आहे.