केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांच्या ‘बीएजी फिल्म एज्युकेशन सोसायटी’ला अंधेरी येथील मोक्याचा भूखंड कवडीमोल किंमतीत दान करण्याबाबतच्या कागदपत्रांची फाईल मंत्रालयाच्या आगीत जळाल्याचे महसूल खात्याकडून सांगण्यात आल्यानंतर दोनच दिवसांत या प्रकरणाची संपूर्ण कागदपत्रे सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केल्याने आता शुक्ला भूखंड प्रकरण ऐरणीवर आले आहे. मंत्रालयात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडेही उपलब्ध नसलेली कागदपत्रे कोठून मिळाली याबाबत सोमय्या यांनी पाळलेले बोलके मौन मात्र राज्य सरकारमधील एका मंत्र्याकडे सूचकपणे अंगुलीनिर्देश करणारे असल्याने आता या प्रकरणाला राजकीय वळण लागणार असे दिसत आहे.
सोमवारी भाजपच्या प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी या फायलीतील सर्व कागदपत्रांचा तारीखवार तपशील उघड केला. सरकार निष्क्रीय असल्याचा आरोप होत असला तरी ‘आपल्या माणसा’साठी ते कसे गतिमान होते, याचे शुक्ला भूखंड प्रकरण हे ‘आदर्श’ उदाहरण आहे, असे सांगत, शेकडो कोटींचा हा भूखंड शुक्ला यांना देण्याचा निर्णय रद्द करून भूखंड तातडीने परत घ्यावा आणि राजीव शुक्ला यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सोमय्या यांनी केली. या प्रकरणाची फाईल आगीत जळाल्याने मुंबई उपनगर कार्यालयाकडे असलेल्या कागदपत्रांच्या आधारे संपूर्ण फाईल नव्याने तयार करण्यात येत असल्याचे सोमय्या यांना महसूल व वन विभागाने कळविले होते. मात्र, सोमय्या यांनीच ही सर्व कागदपत्रे असलेली जाडजूड फाईल मुख्यमंत्र्यांना भेट दिल्याने ‘फाईल जळिता’चे गूढ वाढले आहे.
ही फाईल आपल्याला कोठून मिळाली या प्रश्नावर या पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी प्रारंभी मौन पाळले. आपण काही बोललो तर महसूल खात्याकडून ती कशी मिळाली, कोणत्या मंत्र्याने दिली, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आली की नारायण राणे यांनी दिली असे प्रश्न विचारले जातील म्हणून मी काहीच बोलणार नाही, असे तो म्हणाले. मात्र पुन्हा विचारल्या गेलेल्या प्रश्नावर, कोकणातले हापूस आंबे मधुर असतात, असे ते सूचकपणे म्हणाले. आम्हाला फाईल कोठून मिळाली हे महत्वाचे नाही. आंबे मिळाले की ते कोणी दिले हे महत्वाचे नसते, असे ते म्हणाले. कोकणातील हापूस या त्यांच्या उल्लेखाआधीच त्यांनी नारायण राणे यांचाही उल्लेख केल्याने, सोमय्या यांना शुक्ला प्रकरणाची माहिती आणि कागदपत्रे पुरविणारी व बोलते करणारी व्यक्ती कोण असावी यावरच नंतर पत्रकार परिषदेत कुजबूज सुरू झाली.

Story img Loader