काही दिवसांपासून संपर्काच्या बाहेर असलेले भाजपा नेते किरीट सोमय्या आज (१४ एप्रिल) माध्यमांसमोर आले. सोमय्यांनी मी काही व्यक्तिंसाठी नॉट रिचेबल असेल, बाकी माझं काम मी व्यवस्थित करत होतो असं वक्तव्य केलं. यावेळी किरीट सोमय्या यांनी मी महाराष्ट्राच्या जनतेला वचन देतो म्हणत राज्यातील ठाकरे सरकारला आणखी एक इशारा दिलाय.

किरीट सोमय्या म्हणाले, “मी काही व्यक्तिंसाठी नॉट रिचेबल असेल, बाकी मी व्यवस्थित काम करत होतो. उद्या त्याचा एक नमुना आपल्याला बघायला मिळेल. मी महाराष्ट्राच्या जनतेला वचन देतो की उद्या ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा मी जनतेसमोर ठेवणार आहे.”

“उद्धव ठाकरे यांनी हिंमत असेल तर उत्तर द्यावं”

“संजय राऊत आणि उद्धव ठाकरे अशाप्रकारचं नाटक करण्यात निपूण आहेत. संजय राऊत ईडीच्या तिसऱ्या समन्सनंतर चौकशीसाठी गेले होते. समन्सला वॉरंट म्हणत नाही. संजय राऊत अडीच महिन्याने चौकशीसाठी गेले होते. उद्धव ठाकरे यांनी हिंमत असेल तर उत्तर द्यावं. एक डझन लोकांची संपत्ती घोटाळ्यात अटॅच झाली. कोर्टाने त्यावर रबर स्टँप लावला. जनतेचे पैसे लुटून असे घोटाळे करणारं हे हिंदुस्थानमधील पहिलं राज्य सरकार आहे,” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

हेही वाचा : न्यायव्यवस्थेत एका विशिष्ट विचारांचे लोक; सोमय्यांना अटकेपासून दिलासा मिळाल्यानंतर संजय राऊतांचा गंभीर आरोप

“नवाब मलिक स्वतःही जप्त झाले आणि…”

“उद्धव ठाकरे यांचा मेहुणा श्रीधर पाटणकरची संपत्ती जप्त झाली. नवाब मलिक स्वतःही जप्त झाले आणि त्यांची संपत्तीही जप्त झाली. संजय राऊत यांचीही संपत्ती जप्त झाली. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, भावना गवळी, आनंद अडसूळ, अजित पवार, यशवंत जाधव यांचाही त्यात समावेश आहे. आणखी अनेकांची संपत्ती जप्त होईल. हसन मुश्रीफ, अनिल परब, सुजित पाटकर, सदानंद कदम यांचाही या घोटाळेबाजांमध्ये समावेश आहे,” असंही किरीट सोमय्या यांनी नमूद केलं.