मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. पेडणेकर यांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मिळाणाऱ्या सामान्य नागरिकांच्या सदनिका हस्तगत केल्या आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तर दुसरीकडे पेडणेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. दरम्यान आज किरीट सोमय्या यांनी या पार्श्वभूमीवर निर्मल नगर पोलीस स्टेशन, वांद्रे पूर्व येथे जाऊन किशोरी पेडणेकरांविरोधात फसवणूक, खोटारडेपणा आणि झोपडपट्टीतील रहिवाशांची एसआरए सदनिका हडप केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली.
यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, “मी सगळे पुरावे दिले आहेत, मला पोलिसांनी आश्वासन दिलं आहे. की मी जे पुरावे दिलेले आहेत त्याच्यासंबधीत विभागांशी मग तो झोपडपट्टी प्राधीकरण असो, कंपनी मंत्रालय, मुंबई महापालिका निवडणूक आयुक्त या सगळ्यांशी ते चर्चा करून कागदपत्रे मागवणार आहेत आणि त्यानंतर पुढील कारवाई करणार. मरीनलाईन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.” तसेच, “मंत्रालयाकडून मला आश्वासन मिळालं आहे, पोलिसांनी जर मंत्रालय आणि अन्य विभागाशी संपर्क साधला तर जे वास्तव आहे ते पोलिसांसमोर मांडणार.”
हेही वाचा – ‘…सरनाईक विचारती भाजपाला हेची फळ काय मम तपाला?’- सचिन सावंतांनी लगावला टोला!
याशिवाय सोमय्यांनी हेही सांगितले की, “किशोरी पेडणेकरांच्या विरोधात खरं म्हणजे अर्धा डझन पोलीस स्टेशन्समध्ये गुन्हा दाखल झाला आहे किंवा होऊ शकतो. किशोरी पेडणेकर, त्यांचा मुलगा साईप्रसाद पेडणेकर यांच्याविरोधात न्यू मरीनलाईन पोलीस स्टेशन, दादर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. यातील एक आरोपी चंद्रकांत चव्हाण आणि किशोरी पेडणेकर हे सगळे एसआरएचे गाळे ढापण्यात भागीदार होते. आता वांद्रा पूर्व निर्मलनगर पोलीस स्टेशन. त्यानंतर दादर पोलीस स्टेशनच्या तपासात चंद्रकांत चव्हाणच्या संदर्भात आणखी एक डझन तक्रारी आल्या आहेत. अशापद्धतीने पुरेसे पुरावे आले आहेत.”
याचबरोबर “किशोरी पेडणेकरांनी अजुनपर्यंत संजय अंधारीला का हजर केलं नाही?, संजय अंधारीला किशोरी पेडणेकरांनी गायब केलय का? ज्याच्याकडून जागा भाड्यावर घेतली तो गंगाराम आहे कुठे? मला भीती आहे किशोरी पेडणेकर प्रकरणात या सगळ्यांचा मनसुख हिरेन होऊ नये.”