छगन भुजबळ यांच्या मालमत्तेची पाहणी केल्याने भाजपा नेते किरीट सोमय्या यांना सांताक्रुझ पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली होती. मालमत्तेची पाहणी करताना करोना नियमांचं उल्लंघन करण्यात आल्यानं सोमय्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप सोमय्यांना समन्स बजावण्यात आलेला नसून एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर राहिल्यानंतर किरीट सोमय्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, “पोलिसांनी एफआयआरची प्रत मला देणं ही हास्यास्पद बाब आहे. छगन भुजबळांची १०० कोटींची बेनामी संपत्ती पाहण्यासाठी मी गेलो होतो, हा गुन्हा आहे. त्यांच्या बेनामी संपत्तीचा घोटाळा मी उघड केला होता. त्यानंतर भुजबळ २ वर्ष तुरुंगात गेले. ती प्रॉपर्टी मी मीडियाला सोबत घेऊन बघायला गेलो, ते त्यांना दिसलं, त्यामुळे भुजबळांच्या दबावामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” असा आरोप सोमय्यांनी केला.
मुंबई पोलिसांनी समन्स पाठवल्याने किरीट सोमय्यांचा संताप; म्हणाले “ठाकरे सरकारच्या घोटाळेबाजांनी…”
किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्याला तुरुंगात टाकू, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. आज त्यांनी एफआयआरची प्रत दिली आहे, पुढच्या काही दिवसांत कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेईल असं ते म्हणाले. तसेच घोटाळा करणारे संजय राऊत आणि त्यांचा पार्टनर सुजीत पाटकरविरोधात गुन्हा दाखल होत नाही, परंतु मी १०० कोटींची बेनामी संपत्ती मीडियाला दाखवली म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल होतोय, असं सोमय्यांनी सुनावलं.
“गेल्या १० दिवसांपासून शिवसेना माझ्यावर आरोप करत नौटंकी करत आहे. पण कोणत्याच गुन्ह्याबद्दल ते एक कागद पुरावा म्हणून देऊ शकलेले नाही आणि रोज रंगीत तालिम सुरू आहे, अशी टीका त्यांनी शिवसेना नेत्यांवर केली. मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाही आणि अजित पवार मुख्यमंत्र्यांसारखे वावरतात, मग ते लाइफलाईनवर गुन्हा दाखल का करत नाहीत, असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे आणि अजित पवार राज्याला लुटत असताना मी शांत बसणार नाही. शिवीगाळ सोडा, उद्धव ठाकरेंनी हजार वेळा जरी तुरुंगात टाकलं तरी मी घोटाळामुक्त महाराष्ट्र करून दाखवणार,” असं किरीट सोमय्या म्हणाले. मी पैसे लाटल्याचा आणि कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे, त्यासंदर्भात मी उद्या पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार असल्याचं किरीट सोमय्यांनी सांगितलं.