लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : युवा कीर्तनकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आजच्या पिढीमध्ये कीर्तनाची गोडी लागण्यासाठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच सोनी मराठी वाहिनीवर ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा कथाबाह्य कार्यक्रम (रिऍलिटी शो) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या मंचावर वेगवेगळ्या वयोगटाचे स्पर्धक सहभागी झाले आहेत. तर या मंचावरील सर्वात लहान १२ वर्षीय ह.भ. प. यशस्वीताई आडे महाराज यांनी बंजारा भाषेतील कीर्तन सादर करून परीक्षकांसह उपस्थितांची मने जिंकली आहेत.
आजवर सर्वांनी कीर्तनाची गोडी अनुभवली आहे. मात्र सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या कार्यक्रमाच्या मंचावरील सर्वात चिमुरड्या १२ वर्षीय ह.भ. प. यशस्वीताई आडे यांचे बंजारा भाषेतील कीर्तन ऐकून सर्वजण थक्क झाले आहेत. या मंचावर ह. भ. प. यशस्वीताई आडे यांनी संत सेवालाल महाराज यांचे बंजारा भाषेतील कीर्तन सादर करून उपस्थित प्रेक्षक आणि परीक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी त्यांनी संत नामदेव महाराजांचेही कीर्तन सादर केले. तर ‘छोटी मुक्ताई’ म्हणत परीक्षकांनी त्यांचा गौरवही केला. हा भाग गुरुवार, ९ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता प्रसारित होणार आहे.
घरातील धार्मिक कार्यक्रमांमुळे ह. भ. प. यशस्वीताई आडे यांना लहानपणापासूनच कीर्तनाची गोडी लागली. ज्या वयात मनसोक्तपणे खेळायचे, बागडायचे आणि आई-वडिलांकडे हट्ट करायचा त्या वयात ह. भ. प. यशस्वीताई आडे आपल्या रसाळ वाणीतून वारकरी संप्रदायाची महती सातासमुद्रापार पोहोचवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
नेमका काय आहे कार्यक्रम ?
‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या कार्यक्रमाला विचारवंत, लेखक, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. हा नवाकोरा कार्यक्रम १ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार, रात्री ८.०० वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे. महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमधून एकूण १०८ कीर्तनकार सोनी मराठी वाहिनीने शोधून आणले आहेत. प्रत्येक भागात त्यापैकी ३ कीर्तनकार चक्री कीर्तनाच्या पद्धतीने त्यांची कीर्तन सेवा सादर करीत आहेत. या सर्व कीर्तनकारांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोनी मराठी वाहिनीने दोन दिग्गज कीर्तनकार व परीक्षक ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील व ह.भ.प. राधाताई सानप यांच्यावर सोपविली आहे.