Kirti Vyas Murder Case : मुंबईतील बहुचर्चित किर्ती व्यास हत्याप्रकरणात सत्र न्यायालयाने आरोपी सिद्धेश ताम्हणकर आणि कविता सजलानी (बदलेलं नाव – न्यायालयाच्या आदेशानुसार) या दोघांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सहा वर्षांपूर्वीच्या या खून प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना अद्याप किर्तीचा मृतदेह किंवा मृतदेहाचे अवशेष सापडले नाहीत. मात्र गुन्हे अन्वेशन विभागाने न्यायालयासमोर काही डिजीटल आणि फॉरेन्सिक पुरावे सादर केले. हे पुरावे पुरेसे असल्याचं म्हणत न्यायालयाने दोन्ही आरोपींना या खून प्रकरणात दोषी घोषित केलं आहे. १६ मार्च २०१८ रोजी किर्ती व्यासचा खून झाला होता. मे २०१८ मध्ये पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यानंतर तीन महिन्यांनी पोलिसांनी या प्रकरणी चार्जशीट दाखल केली. कविता सजलानी हिला २०२१ मध्ये न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र सिद्धेश ताम्हणकर अद्याप तुरुंगात आहे.
हे देखील शीना बोरा प्रकरणासारखं हाय प्रोफाईल हत्याप्रकरण होतं. त्यामुळे मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर, गुन्हे अन्वेशन विभागाचे प्रमुख संजय सक्सेना, सहआयुक्त के. एम. प्रसन्ना हे सातत्याने या प्रकरणावर लक्ष ठेवून होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना कविता सजलानीच्या फोर्ड इकोस्पोर्ट कारमध्ये रक्ताचे काही डाग सापडले. फॉरेन्सिकने त्याची तपासणी केली असता त्यांच्या लक्षात आलं की, हे किर्तीच्या रक्ताचे (मासिक पाळीत होणारा रक्तस्राव) डाग आहेत. त्यानंतर पोलिसांनी कविताची चौकशी सुरू केली. कविताच्या जबानीत सिद्धेश ताम्हणकरचा उल्लेख आल्यावर पोलिसांनी सिद्धेशला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी सुरू केली.
किर्ती व्यास अंधेरी येथे बी ब्लंट या कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत होती. एक बॉलिवूड अभिनेता या कंपनीशी संबंधित आहे. कविता सजलानी आणि सिद्धेश ताम्हणकर हे याच कंपनीत काम करत होते. कविता आणि सिद्धेशचं अफेयर चालू होतं. सिद्धेश कार्यालयात चांगलं काम करत नव्हता. अशातच केंद्र सरकारने जीएसटी प्रणाली लागू केली. मात्र सिद्धेशला त्यातलं फारसं ज्ञान नव्हतं. तसेच जीएसटीबाबत शिकण्यात त्याला रस नव्हता. त्यामुळे किर्तीने सिद्धेशला नोटीस बजावली. ज्या दिवशी किर्तीचा खून झाला तो सिद्धेशला बजावलेल्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी दिलेल्या मुदतीचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सिद्धेशला नोकरी गमावण्याची भीती होती.
१६ मार्च रोजी सिद्धेश आणि कविता मुंबईतील डी. बी. मार्ग परिसरात गेले होते. किर्ती या परिसरात राहत होती. किर्ती ऑफिसला जाण्यासाठी घरातून निघाली त्याचवेळी सिद्धेश आणि कविताने तिला काही कारण सांगून त्यांच्या कारमध्ये बसवलं. कार सुरू झाल्यावर किर्तीला त्या दोघांनी सिद्धेशला पाठवलेली नोटीस मागे घेण्यास सांगितलं. किर्तीने त्यास नकार दिल्यानंतर तिचा गळा दाबून हत्या करण्यात आली. त्यानंतर किर्तीचा मृतदेह कारच्या मागच्या सीटवर ठेवण्यात आला. कविताने ही कार परळ भागात नेली. सिद्धेश तिथे कारमधून उतरला आणि तिथून ऑफिसला गेला. तर कविता किर्तीचा मृतदेह असलेली कार घेऊन सांताक्रुझला तिच्या घराकडे गेली. इमारतीच्या पार्किंगमध्ये कार उभी करून कवितादेखील ऑफिसला गेली. सायंकाळी सिद्धेश आणि कविता एकामागोमाग ऑफसमधून बाहेर पडले. त्यानंतर दोघांनी कविताच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी असलेली कार घेतली आणि चेंबूरला गेले. त्यांनी किर्तीचा मृतदेह चेंबूरमधील माहुल गावातील एका नाल्यात फेकला.
हे ही वाचा >> शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करणार? शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले, “तो श्लोक अतिशय चांगला…”
सिद्धेश-कविता किर्तीचा खून करून पोलीस ठाण्यातही गेले होते
त्याच दिवशी रात्री किर्तीच्या आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार केली. त्या दिवशी बी ब्लंट कंपनीतील किर्तीचे अनेक सहकारी देखील पोलीस ठाण्यात गेले. त्यांच्याबरोबर सिद्धेश आणि कवितादेखील पोलीस ठाण्यात गेले, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. पोलिसांनी किर्तीचं घर, इमारत आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा निर्णय घेतला तेव्हा दोन्ही आरोपी घाबरले. त्यांनी पोलिसांना सांगितलं की, १६ मार्च रोजी किर्ती आमच्या कारमध्ये होती. आम्ही तिला मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळ सोडलं. कारण ती रेल्वेने ऑफिसला जात होती. रेल्वे स्टेशन आणि आसपासच्या कोणत्याही सीसीटीव्ही फुटेजमध्ये किर्ती दिसली नाही. त्यामुळे पोलिसांनी कविताच्या कारची फॉरेन्सिक टीमकडून तपासणी करून घेतली. फॉरेन्सिकमधील पथकाला कविताच्या कारमध्ये किर्तीच्या रक्ताचे डाग सापडले आणि तिथून या खून प्रकरणाचा गुंता सुटला.