मुंबई : अभिनेता फरहान अख्तरची विभक्त पत्नी अधुना हिच्या बी ब्लंट सलूनच्या अंधेरी येथील कार्यालयातील वित्त व्यवस्थापक कीर्ती व्यास हिच्या हत्येप्रकरणी सिद्धेश ताम्हणकर आणि त्याची मैत्रीण या दोघांना सत्र न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कीर्तीचा मृतदेह सापडला नसला तरी आरोपींनीच तिची हत्या केल्याचे सिद्ध करण्यात पोलिसांना यश आल्याचे निरीक्षण न्यायालयाने दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावताना नोंदवले.
कीर्तीच्या हत्येप्रकरणी सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी सोमवारी या दोघांना त्यांच्यावरील सर्व आरोपांत दोषी ठरवले होते. दोघांच्या शिक्षेबाबत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली जात असल्याचे स्पष्ट केले. कीर्तीचा मृतदेह अखेरपर्यंत सापडला नाही. परंतु, पोलिसांचा खटला हा दोन्ही आरोपींसह कीर्ती अखेरची दिसली होती या दाव्यावर आणि परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित होता. तथापि, केवळ या दोन्ही बाबींवरच खटला अवलंबून नव्हता. तर पोलिसांनी प्रत्येक परिस्थिती नि:संशय सिद्ध केल्याचे न्यायालयाने प्रामुख्याने नमूद केले.
हेही वाचा – मुंबई : रमाबाई आंबेडकर नगरचे सर्वेक्षण पूर्ण
खटल्यादरम्यान सादर करण्यात आलेल्या सर्व पुराव्यांवरून आरोपींनी कारमध्ये कीर्ती हिचा गळा आवळून खून केला. गाडीच्या मागील आसनावर सापडलेले रक्ताचे डाग आणि डीएनए विश्लेषण अहवालाने या निष्कर्षाला पुष्टी दिल्याचेही न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावताना स्पष्ट केले. असे त्यात म्हटले आहे.
हेही वाचा – सीईटीपाठोपाठ आता बीए – बीएस्सी-बी.एडचे प्रश्न, उत्तरे आक्षेपासाठी उपलब्ध
ग्रँट रोड येथे वास्तव्यास असलेली कीर्ती मार्च २०१८ मध्ये अचानक बेपत्ता झाली. घरातून कामासाठी निघालेली कीर्ती कार्यालयात पोहोचली नाही. तसेच, तिचे दोन्ही फोन बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर तिची बहीण शेफाली हिने कीर्ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली. एका महिन्यांनंतर पोलिसांनी सिद्धेश आणि त्याच्या मैत्रिणीला हत्येच्या आरोपाखाली अटक केली होती.