अंधेरी पूर्व निवडणुकीत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटकेंना उमेदवारी दिली. मात्र, त्यांचा पालिकेतील नोकरीचा राजीनामा स्वीकारला जात नसल्याने त्यांच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. अशातच त्या स्वतः शिंदे गटात जाण्याचा प्रयत्न करत असल्याच्या आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याच्या चर्चा आहेत. याबाबत मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर पेडणेकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्या बुधवारी (१२ ऑक्टोबर) मुंबईत पत्रकारांशी बोलत होत्या.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “ऋतुजा लटके स्वतः शिंदे गटात जाण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. मला आत्ता तरी तसं वाटत नाही. ज्याअर्थी मुंबई महानगरपालिका आयुक्तांवर दबाव टाकला जात आहे तसाच दबाव ऋतुजा लटकेंवर टाकला जात आहे का हे पाहावं लागेल. मला त्याबद्दल काही माहिती नाही, पण ऋतुजा लटके दबावाला बळी पडणार नाहीत. कारण त्या दिवंगत रमेश लटकेंच्या पत्नी आहेत.”
“ऋतुजा लटकेंच्या घरात बाळासाहेब ठाकरेंनी दिलेलं बाळकडू”
“रमेश लटके शिवसैनिका, शाखाप्रमुख असं काम करत करत आमदार पदापर्यंत पोहचले होते. त्यामुळे त्यांच्या घरातील बाळकडू उद्धव ठाकरेंच्या वडिलांनी म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी दिलेलं बाळकडू आहे. त्यामुळे त्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाबरोबरच राहतील, अशी आम्हाला खात्री आहे,” असा विश्वास किशोरी पेडणेकरांनी व्यक्त केला.
“पैसे भरूनही राजीनामा स्वीकारला नाही”
“या प्रकरणात आम्हाला कोर्टात जावंच लागेल. कोर्टाने यांचं तोंड फोडलं की, मग महापालिका जागी होते. कोर्ट भेदभाव करणार नाही. ऋतुजा लटकेंनी जे पैसे भरायचे ते पैसे भरूनही राजीनामा स्वीकारला नाही याचा अर्थ ते शिंदे-फडणवीस सरकारच्या जोरजबरदस्तीला बळी पडत आहेत,” असा आरोप पेडणेकरांनी केला.
“लटकेंचा राजीनामा मंजूर केला नाही, तर शिवसेना स्टाईलने उत्तर देणार का?”
लटकेंचा राजीनामा मंजूर केला नाही, तर शिवसेना स्टाईलने उत्तर देणार का? असा प्रश्न विचारला असता किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “पालिकेने ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर केला नाही, तर शिवसेना कायदा हातात घेणार नाही.”
“आमच्या त्याच स्टाईल बाहेर काढण्यासाठी सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. मात्र, आम्ही संयमानेच जाणार आहोत. कारण आमच्या स्टाईलमुळे महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवट लागू नये असं आम्हाला वाटतं. आमच्या कृतीमुळे राष्ट्रपती राजवट लागली, असा कलंक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या आमच्या पक्षाला नको आहे,” असं मत किशोरी पेडणेकरांनी व्यक्त केलं.