मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अभिनेत्री कंगना रनौतच्या स्वातंत्र्याविषयीच्या वादग्रस्त वक्तव्याचा खरपूस समाचार घेतलाय. कंगना स्वतः महाराष्ट्रात, मुंबईत भीक मागण्यासाठी आली आहे. तिनला इथंच भीक मिळाली. ती काय इतरांना शिकवते? असा प्रश्न किशोरी पेडणेकर यांनी विचारला आहे. यावेळी त्यांनी कंगनाने या वक्तव्यासाठी माफी मागावी, अशीही मागणी केली.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान दिलं ते आपले कुणीतरी लागतात. मुंबई, महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात जे स्वातंत्र्य मिळालं आहे ते त्याग केल्यानंतरच मिळालं आहे. त्या त्यागमूर्तींविषयी ही नटी असं बोलते. खरंतर तिच इथं महाराष्ट्रात, मुंबईत भीक मागण्यासाठी आलीय. तिला इथंच भीक मिळाली आहे. ती काय इतरांना शिकवते?

“कंगनाने आपल्या या वक्तव्यासाठी माफी मागितली पाहिजे. खरंतर ती माफीच्या देखील लायक नाही. ती अगदी कामातून गेलेली आहे. तिने आधी जतन केलेला इतिहास पाहावा. खोट्याची महाराणी बनून फायदा नाही,” असंही किशोरी पेडणेकर यांनी नमूद केलं.

कंगना नेमकं काय म्हणाली होती?

कंगनाने नुकतीच टाइम्स नाऊच्या एका समिटमध्ये हजेरी लावली होती. यावेळी दिलेल्या मुलाखतीत, “सावरकर, राणी लक्ष्मीबाई, सुभाषचंद्र बोस यांना स्वातंत्र्यासाठी रक्त सांडणार हे माहित होतं. मात्र भारतीयांकडूनच भारतीयांवर वार होणार नाही हे ध्यानात ठेवायला हवं. स्वातंत्र्यासाठी नक्कीच त्यांचं मोलाचं योगदान आहे. मात्र ते स्वातंत्र्य नव्हतं ती भीक होती. जे स्वातंत्र्य मिळालं ते २०१४ सालामध्ये मिळालं” असे वादग्रस्त वक्तव्य कंगनाने केलं आहे.

हेही वाचा : कंगनाच्या वक्तव्यावर नीलम गोऱ्हे संतापल्या; म्हणाल्या, “मी राष्ट्रपतींना…”

त्यावर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कंगनावर ट्विटच्या माध्यमातून टीका केली आहे. “इतिहास हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून सर्व विद्यार्थ्यांनी व तरुणांनी त्याचा चांगला अभ्यास केला पाहिजे. इतिहासाच्या ज्ञानाच्या कमतरतेमुळे खाली दिलेल्या सारख्या लाजिरवाण्या चुका आणि गैरसमज होऊ शकतात,” असे म्हणत वर्षा गायकवाड यांनी कंगनाच्या मुलाखतीचा तो व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Story img Loader