शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. तसेच राणा दाम्पत्याला सी ग्रेड पब्लिसिटी लागते त्यासाठीच ते काहीही बरळत असल्याचा गंभीर आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला. त्या मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होत्या.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “राणा दाम्पत्याला सी ग्रेडची पब्लिसिटी लागते. त्या पब्लिसिटीसाठी काहीही बरळत आहेत. संवैधानिक पदांवर हल्ला करत आहेत. म्हणून मी अशा लोकांचा निषेध करते. पोलीस, न्यायालय यांनी याकडे प्रकर्षाने लक्ष द्यायला हवं. कारण त्यांना जामिनावर सोडलेलं आहे. त्यांना ज्या अटीशर्तींवर जामीन दिला त्याचा ते भंग करत आहेत. ते कोर्टालाही मानत नाहीत.”
“सी ग्रेड पब्लिसिटी करणाऱ्या कपलवर कारवाई करावी”
“संविधानाच्या गोष्टी करतात, पण संविधानालाही ते मानत नाहीत. त्यामुळे अशी सी ग्रेड पब्लिसिटी करणाऱ्या कपलवर ते खासदार-आमदार असले तरी कारवाई करावी. राणा दाम्पत्य दोघेही महाराष्ट्रात अत्यंत वाह्यात काम करत आहेत. त्यामुळे पोलीस आणि न्यायालयाने याची नक्की दखल घ्यावी. मुख्यमंत्री आणि सरकारकडून तर दखल घेतली जाईलच,” असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
हेही वाचा : “तुमच्या खाजेवर औषध…”; नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या आव्हानावर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया
“…मग तुम्ही खासगीपणावर काय बोलता”
“राणा दाम्पत्याला खासगी काय असतं हेच कळत नाहीये. ते विसंगत बोलत आहेत. १४ दिवसांनी झालेली नवऱ्याची भेट खासगी असायला हवी, तर तो व्हिडीओ व्हायरल करताना त्यांना काहीच वाटलं नाही. मग तुम्ही खासगीपणावर काय बोलता. तुम्ही एमआरआय करताना प्रसिद्धीत येण्यासाठी मान वर करता तर ते कसं खासगी होईल. ते बेताल आणि विसंगत बोलत आहेत,” असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला.