भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप करत त्यांनी अनधिकृतरित्या वरळी गोमाता जनता एसआरएमध्ये सहा सदनिका हस्तगत केल्या, असा आरोप केला होता. त्यानंतर याप्रकरणी दादर पोलिसांकडून पेडणेकरांची चौकशी करण्यात आली. दरम्यान, आज किशोरी पेडणेकरांनी ‘मातोश्री’वर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?
”मातोश्रीवर जेव्हा पदाधिकाऱ्यांना बोलावलं जातं, तेव्हा पक्षाच्या वाढीसाठी सुचना दिल्या जातात. त्यानुसार आज आम्ही उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी काही सुचना केल्या. तसेच एसआरए प्रकरणावरून उद्धव ठाकरेंशी कोणतीही चर्चा झाली नाही. मी तुम्हाला एवढं सांगू इच्छिते की तुम्हीही या प्रकरणाच्या तळाशी जाऊन चौकशी करा. एका महिलेवर असा राजकीय अत्याचार कितीदा करणार आहात? हे प्रकरण न्यायालयातही आहे, त्याचा मनस्ताप होतोच आहे, शिवाय हे माझी बदनामी करण्याचं षडयंत्र आहे. मी अशा बदनामीला घाबरत नाही”, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
हेही वाचा – बच्चू कडू-राणा वादावर मंत्री गुलाबराव पाटलांचं विधान; देवेंद्र फडणवीसांना विनंती करत म्हणाले, “आता दोघांना…”
”आज वाट्टेल ते आरोप करण्याच्या सुपाऱ्या माझा भाऊ घेतो आहे. त्याला मला तितकारा आला आहे, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी भाजपा नेते किरीट सौमय्या यांना लगावला आहे. दरवेळी किरीट सोमय्या प्रत्येकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. या प्रकरणाबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. सोमय्या हे एकाच गोष्टीला घेऊन वारंवार आरोप करत आहेत. विरोधातील नेत्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असेही त्या म्हणाल्या.