मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहे. तर सुहास वाडकर यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. आदित्य ठाकरे यांच्या प्रचारासाठी वरळी पिंजून काढणाऱ्या किशोरी पेडणेकर यांच्यासह पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या नावाचीही महापौर पदासाठी चर्चा होती. मात्र, सोमवारी सायंकाळी अखेरच्या क्षणी पेडणेकर यांचे नाव जाहीर करण्यात आले होते.

मुंबईतील खड्डय़ांचे प्रश्न असो की विविध कारणांमुळे पक्षावर होणारी टीका असो, प्रत्येक वेळी तडफेने प्रत्युत्तर देणाऱ्या ज्येष्ठ नगरसेविका किशोरी पेडणेकर यांना पक्षनेतृत्वाशी एकनिष्ठ राहण्याचे बक्षीस त्यांना मिळाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

आणखी वाचा- उल्हासनगर महापालिकेवर पुन्हा शिवसेनेचा महापौर, अवघ्या अडीच वर्षात भाजपाकडून हिसकवली सत्ता

गिरणी कामगारांच्या कुटुंबातून असलेल्या किशोरी पेडणेकर या कट्टर शिवसैनिक आहेत. रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात त्या अग्रेसर असतात. परिचारिकेचे शिक्षण घेतलेल्या किशोरी यांची नगरसेविका पदाची ही तिसरी वेळ आहे. स्थायी समिती, महिला बाल कल्याण समिती, सुधार समिती या समित्यांवरील कामाचा त्यांना अनुभव आहे. विधानसभा निवणुकीच्या वेळी आदित्य ठाकरे यांच्या प्रचारासाठी त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता. निष्ठावान अशी ओळख असलेल्या किशोरी यांच्यावर मातोश्रीचाही विश्वास आहे. त्यामुळे महापौर पद महिला आरक्षित नसतानाही पुरुषांना डावलून किशोरी यांच्या नावाची घोषणा पक्षाने केली होती.

बिनविरोध निवड
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी यावेळी झालेली निवडणूक तब्बल ५० वर्षांनी बिनविरोध झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे ९४, भाजपाचे ८३, काँग्रेसचे २९, राष्ट्रवादी काँग्रेसचे ८, सपाचे ६, मनसेचा १ तर एमआयएमचे दोन नगरसेवक आहेत.

Story img Loader