माजी महापौर आणि शिवसेना ( ठाकरे गट ) नेत्या किशोरी पेडणेकर सध्या भाजपा नेते किरीट सोमैया यांच्या रडारवर आहेत. किशोरी पेडणेकर यांनी एसआरए प्रकल्पात घोटाळा केल्याचा गंभीर आरोप सोमैया यांनी केला आहे. याचे कथित पुरावे किरीट सोमैयांनी सादर केले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी किशोरी पेडणेकर दादर पोलीस ठाण्यात हजर झाल्या आहेत.
झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सदनिका देण्याच्या नावाखाली रक्कम घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पेडणेकर यांच्यावरही आरोप करण्यात आले होते. याप्रकरणी किरीट सोमैयांनी दादर पोलीस ठाण्यात भेट देत पेडणेकर यांच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार पेडणेकर यांना पोलिसांनी समन्स बजावलं होतं. या चौकशीसाठी पेडणेकर दादर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
हेही वाचा : एसआरए घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांचे पेडणेकरांना खुले आव्हान; म्हणाले, “संजय अंधारी नावाच्या…”
काय आहेत आरोप?
झोपु प्रकल्पात स्वस्तात सदनिका देण्याचे आमिष दाखवून ९ जणांची फसवणूक केल्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात जून महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, याप्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी चौकशीत पेडणेकर यांच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे आरोपींच्या दाव्याची पडताळणी करण्यासाठी पेडणेकर यांच्याही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी किरीट सोमैया यांनी केली होती.