मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करण्यावरून राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ”या कब्रिस्तानची जबाबदारी मुंबई मनपाकडे असून पेग्विन सेनेने कबर बचाव कार्यक्रम सुरू केला” असल्याचा टोला त्यांनी लगावला होता. त्याला शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
हेही वाचा – याकूब मेमन कबर सुशोभिकरणावरून आदित्य ठाकरेंचा भाजपालाच प्रतिप्रश्न; म्हणाले, “तेव्हाच एका अतिरेक्याला…!”
काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?
“आशिष शेलारांकडे २०१७ मध्ये आणि आता पण मुंबईची जबाबदारी आहे. अशावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी कितीही टीका केली, तरी त्यांची लोकप्रियता काही कमी होत नाही. सर्व हिंदू संघटना उद्धव ठाकरेंकडे जातात आहे. हे बघून आशिष शेलार बावचळले आहेत. मुळात ज्या पद्धतीने हा आरोप होतो आहे, हे आरोप बिनबुडाचे आहेत, हे लोकांना कळत आहे. ‘जामा मशीद ऑफ बॉम्बे ट्रस्ट’ ही खूप जुनी संस्था आहे. ते कब्रस्थानही याच ट्रस्टचं आहे. त्यामुळे हे सर्व या ट्रस्टमार्फत झाले आहे. यामध्ये काडीचाही संबंध मुंबई महापालिकेचा नाही. तसेच महाविकास आघाडी सरकारचाही यात संबंध नाही. मात्र, कसंही करून भाजपाला मुंबई जिंकायची आहे. त्यामुळे सर्वांना भ्रमीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे”, असे प्रत्युत्तर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे.
हेही वाचा – ‘याकुबचा मृतदेह कुटुंबाकडे का सोपवला?’, काँग्रेसची विचारणा, भाजपा म्हणाली ‘लाज वाटली पाहिजे, इतकी निर्लज्ज…”
“आशिष शेलाराचे अनेक फोटो आहेत, ज्यात ते मौलानांना पेढे भरवत आहेत. टोपी घालून बसलेले पण फोटो आहेत. तेव्हा तुमचं हिंदूत्त्व कुठे जातं? शिवसेनेना फक्त देशविरोधी मुस्लिमांचा राग केला आहे. मातोश्रीवर अनेकदा अनेकांनी नमाज पठणही केले आहे. वड्याची साल पिंपळाला आणि पिंपळाची साल वडाला लावण्याचा हा प्रकार आहे. केवळ उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे”, असेही त्या म्हणाल्या.
“याकूबच्या कबरीला केलेल्या सजावटीचा महाविकास आघाडी सरकारचा संबंध नाही. त्यापूर्वी पाच वर्ष तुमचे सरकार होते. तेव्हा याबाबत का शब्द काढला नाही आणि आता सुद्धा तुमचे सरकार आहे. हिंमत असेल तर या ट्रस्ट बंद करून दाखवा”, असे आव्हानही पेडणेकरांनी आशिष शेलारांना दिले.