शिवसेनेतील बंडाखोरी नंतर यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार यावरून संघर्ष निर्माण झाला होता. हे प्रकरण न्यायालयातही गेलं होतं. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कात होत आहे. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होत आहे. यासाठी दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन सुरू आहे. तसेच दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आणि टोलेबाजी सुरू आहे. दरम्यान, दसरा मेळाव्यावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दोन दसरा मेळावा होत असल्याने मला दुख होत आहे, असे वक्तव्य केले होते. त्याला आता शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रत्त्युतर दिले आहे.
हेही वाचा – “अजित पवारांना सत्तेत येण्याची स्वप्न पडत आहेत, पण ते…”; चंद्रशेखर बावनकुळेंचा अजित पवारांना खोचक टोला
काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?
“दसरा मेळाव्याबाबत त्यांना काय वाटतं हे कोणीही विचारलं आहे का? भर विधानसभेत ते बोलले होते, ‘माझ्या मुलाला उद्धव ठाकरेंनी तिकीट दिलं. मी इतेक वर्ष शिवसेनेत काम केलं. त्यामुळे मी समाधानी आहे.’ पण नंतर उलटे ढेकर देणारे हेच रामदास कदम होते. त्यामुळे त्यांनी जिथे जायचं तिथे जावं”, अशी बोचरी टीका किशोरी पेडणेकर यांनी रामदास कदमांवर केली होती.
हेही वाचा – Shinde vs Thackeray: शिंदेंच्या बंडानंतरची पहिली निवडणूक जाहीर, रंगणार नवा ‘सामना’, पण चिन्हाचं काय?
काय म्हणाले होते रामदास कदम?
माध्यमांशी बोलताना रामदास कदम यांनी दोन दसरा मेळावा होत असल्याचे दुख: आहे असे वक्तव्य केले होते. “यंदा दोन दसरा मेळावे होत आहेत. पण मी त्यावर समाधानी नाही. आम्ही रक्ताचं पाणी करून पक्ष उभा केला आहे. शेकडो केसेस आम्ही अंगावर घेतल्या. किती तरी यातना आम्ही भोगल्या. त्यामुळे दोन मेळावे बघून दुःख होत आहे”, असे ते म्हणाले होते.