खासदार नवनीत राणा यांनी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्यावर झालेल्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला आव्हान दिल्याचं पाहायला मिळालं. उद्धव ठाकरेंनी जनतेमधून निवडणूक लढून विजयी होऊन दाखवावं. महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा निवडा, तुमच्यासमोर एक महिला उभी राहून लढून दाखवेल, असं राणा म्हणाल्या. यावर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया देत नवनीत राणा जे बोलल्यात ते हल्लाबोल नसून त्यांची खाज आहे, अशी खरपूस टीका केली.
“नवनीत राणा जाणूनबुजून महाराष्ट्र आणि मुंबई अस्थिर करण्यासाठी, दंगल घडवण्यासाठी अशी वक्तव्ये करत आहेत. त्या बोलल्या ते हल्लाबोल नसून त्यांच्यातली खाज आहे. त्यांच्या वक्तव्याला हल्लाबोल म्हणणं म्हणजे त्या शब्दाचा अपमान आहे. आपले मुख्यमंत्री हल्लाबोल करण्यासारखे नाहीत. उद्धव ठाकरे हे त्यांच्या चांगल्या कामामुळे केवळ राज्यातच नाही तर देशातही अव्वल आले, ती खरी दोघांचीही पोटदुखी आहे, एकाचा भोंगा आहे तर दुसऱ्याचा सोंगा आहे आणि अॅम्प्लिफायर तर वेगळाच आहे,” असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी राणा दाम्पत्यासह राज ठाकरेंवर आणि भाजपावर निशाणा साधला.
“उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यात दम असेल तर…”, नवनीत राणा यांचं मुख्यमंत्र्यांना जाहीर आव्हान
उद्धव ठाकरेंनी जनतेमधून निवडणूक लढून विजयी होऊन दाखवावं, असं आव्हान नवनीत राणांनी दिलं होतं त्यावर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “तुझी लायकी तरी आहे का? लोकशाहीने अधिकार दिला म्हणून काहीही बोलायचं. खासदार आहात ना, मग त्याप्रमाणे तुमचं वर्तन असूदेत ना. नंतरचे जे फोटो आलेत त्यातली नासमज अजूनही आहे, असं वाटतंय. आम्हाला वाटलं होतं, बबली मोठी झाली, पण नाही बबली मोठी नाही झाली. बबली नासमझ है, मागचा अॅम्प्लिफायर लावला जातोय आणि ती खाज वाढतेय, पण त्या खाजेवर आमच्याकडे औषध आहे,” अशा शब्दांत पेडणेकर यांनी नवनीत राणांवर सडकून टीका केली. त्या टीव्ही ९ मराठीशी बोलत होत्या.
किशोरी पेडणेकरांनी उल्लेख केलेले नवनीत राणांचे अॅम्प्लिफायर कोण?
ही ऊर्जा अॅम्प्लिफायरची –
मुख्यमंत्र्यांवरील टीकेला प्रत्युत्तर देताना पेडणेकर म्हणाल्या, “बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या ठाकरे घराण्यातील लोकांबद्दल आणि शरद पवार यांच्याबद्दल बोलल्याशिवाय या लोकांना प्रसिद्धी मिळत नाही. हे सगळं प्रसिद्धीसाठी आहे. आपण पाहिलं की गेल्या दोन दिवसांत नवनीत राणांना कोण जाऊन भेटलं ते सगळे अॅम्प्लिफायर (किरीट सोमय्या, देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार) आहेत आणि ही तिकडची ऊर्जा आहे. पण आम्हाला आम्हाला फरक पडत नाही, अशा आव्हानांमुळे शिवसेना अजून उजळून निघेल,” असं पेडणेकर म्हणाल्या.
…म्हणून अॅम्प्लिफायर गरजेचा आहे–
नवनीत राणांचं रुग्णालयाबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी स्वागत केलं, यावरून पेडणेकरांनी निशाणा साधला. त्या म्हणाल्या, “असे भोंगे आणि असे सोंगे लागणारच हे त्यांना कळून चुकलंय. म्हणून अॅम्प्लिफायर गरजेचा आहे. शिवसेनेनं मुंबई आणि महाराष्ट्रासाठी कायमच संघर्ष केलाय. संघर्ष आम्हाला नवा नाही.” तसेच मुंबईत पालिकेच्या शाळांचा स्तर उंचावल्याचा दावाही पेडणेकरांनी केला.
विरुद्ध दिशेला भाजपाचा भोंगा अन् सोंगा –
गाय किंवा म्हैस पळवायची असेल तर विरुद्ध दिशेला घंटा वाजवला जातो, त्याप्रमाणेच भाजपाकडून विरुद्ध दिशेला हा भोंगा आणि सोंगा वाजवला जातोय. महागाई वाढलीये, त्यावर बोलायचं नाही, १५ लाखांवर बोलायचं नाही, अच्छे दिन कधी येणार यावर बोलायचं नाही. तसेच यावर दुसऱ्यांनी बोलू नये म्हणून म्हैस पळवली जाते, घंटा आणि भोंगा-सोंगा वाजवला जातो. पण आता आम्ही आमच्या कामावरून लोकांपर्यंत पोहोचू, असं पेडणेकर म्हणाल्या.
तुम्ही येऊनच दाखवा, नवनीत राणांना आव्हान –
मुंबईत शिवसेनेच्या विरोधात प्रचारासाठी बोलावल्यास जाणार असं नवनीत राणा म्हणाल्या होत्या. “खोट्या सर्टिफिकेटवाल्या तुमच्या सारख्या लोकांची आम्हालाही गरजच आहे, तुम्ही येऊनच दाखवा,” असा खोचक टोला लगावत पेडणेकरांनी नवनीत राणांना आव्हान दिलं.
शिवसैनिक अक्कल ठिकाणावर आणतील –
“बबलीची अक्कल ठिकाणावर आली नसेल शिवसैनिक ठिकाणावर आणतील. नाटकं करणं सोप्प असतं, तुरुंगात १४ वर्ष काढायची तयारी होती, तर मग हे दुखतंय, ते दुखतंय, असं करत रुग्णालयात का पोहोचल्या. आम्ही संविधान आणि कायद्यात राहून तुम्हाला उत्तर देऊ. तसेच बंटी आणि बबली तुम्ही कोर्टाने घालून दिलेले नियम लक्षात घ्या, अॅम्प्लिफायरचं जास्त ऐकू नका,” असं पेडणेकर म्हणाल्या.