मुंबई : रसिकांसमोर गाणे सादर करत अखेरचा श्वास घेणारे प्रसिद्ध गायक केके ऊर्फ कृष्णकुमार कुन्नथ यांच्या पार्थिवावर गुरुवारी मुंबईत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत गायक म्हणून कारकीर्द सुरू करण्याची प्रेरणा देणारे गायक हरीहरन यांच्यासह चित्रपट संगीतातील अनेक गायक, संगीतकार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत साश्रुनयनाने केके यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
कोलकाता येथील कार्यक्रमानंतर हृदयविकाराच्या झटक्याने केके यांचे निधन झाले होते. त्यांचे पार्थिव गुरूवारी काही काळ अंधेरीतील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. श्रेया घोषाल, सलीम मर्चंट, अलका याज्ञिक, राहुल वैद्य, जावेद अली, पॅपॉन, शंतनू मोईत्रा, सुदेश भोसले यांनी निवासस्थानी जाऊन त्यांचे अखेरचे दर्शन घेतले.
केके यांचे पार्थिव फुलांनी सजवलेल्या शववाहिनीतून वर्सोव्यातील स्मशानभूमीत आणण्यात आले. दुपारी २ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. दिग्दर्शक- संगीतकार विशाल भारद्वाज, जावेद अख्तर, अशोक पंडित, शंकर महादेवन, उदित नारायण आणि अभिजीत भट्टाचार्य यांच्यासह अनेक मान्यवर आपल्या या लाडक्या सहकाऱ्याला अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते.