शिवसेनेचं विधीमंडळातील राजकारण आजच्याच दिवशी बरोबर ५१ वर्षांपूर्वी सुरू झालं. कामगार नेते कृष्णा देसाई यांची हत्या झाल्यानंतर परळ विधानसभा मतदारसंघात पोट निवडणूक लागली. तेव्हा कम्युनिस्टांकडून कृष्णा देसाई यांच्या पत्नी सरोजिनी कृष्णा देसाई यांना उमेदवारी देण्यात आली. शिवसेनेने देखील आपला उमेदवार उतरवला आणि अटीतटीच्या या निवडणुकीत अगदी थोड्या फरकाने शिवसेनेने सरोजिनी देसाई यांचा पराभव केला. यासह शिवसेनेचा पहिला आमदार विधानसभेत पोहचला. वामनराव महाडिक असं या शिवसेनेच्या पहिल्या आमदाराचं नाव.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाळासाहेब ठाकरे यांची मुंबईतील लोकप्रियता आणि मुंबईतील मराठी माणसांचा मुद्दा केंद्रस्थानी ठेऊन प्रचार केलेल्या शिवसेनेने परळमधून विधीमंडळात प्रवेश केला. त्यामुळेच शिवसेनेसाठी हा महत्त्वाचा दिवस आहे.

परळमधील अटीतटीची लढत नेमकी कशी झाली?

वामनराव महाडिक आणि सरोजिनी देसाई यांच्यात झालेल्या या पोटनिवडणुकीत दोन्ही पक्ष ताकदीने उतरले. दोन्ही पक्षांकडून अगदी प्रतिष्ठेची झालेली ही निवडणूक त्या काळी चांगलाच चर्चेचा विषय ठरली. त्यामुळे या निवडणूक निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. या मतदारसंघात एकूण ८६ हजार ७३३ मतदार होते. यापैकी ६२ हजार ६२२ मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला.

अवघ्या १६७९ मतांनी वामनराव महाडिकांकडून सरोजिनी देसाई यांचा पराभव

अखेर २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता या निवडणुकीचा निकाल लागला. यात वामनराव महाडिक यांना ३१ हजार ५९२ मतं मिळाली, तर सरोजिनी देसाईंना २९ हजार ९१३ मतं मिळाली. जवळपास १११० मतं बाद ठरली. यासह महाडिक यांनी अवघ्या १६७९ मतांनी सरोजिनी देसाई यांचा पराभव केला. यानंतर शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. इथूनच शिवसेनेने जोर पकडला.

हेही वाचा : महाविकासआघाडीतील मंत्र्यांनी नुसतं खुर्च्यांवर बसू नका, तर… : संजय राऊत

परळमध्ये पोटनिवडणूक का झाली?

शिवसेनेच्या स्थापनेआधी मुंबईत कामगार संघटनांचा मोठा प्रभाव होता. या कामगार संघटना कम्युनिस्ट नेत्यांच्या नेतृत्वात काम करत होत्या. त्यामुळेच वर्चस्वाच्या लढाईत शिवसेना आणि कम्युनिस्टांबरोबर संघर्ष झाला. पुढे हा संघर्ष इतका टोकाचा झाला की यात कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाई यांची हत्या झाली.

यानंतर शिवसेनेसह बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हत्येत हात असल्याचा आरोप झाला. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील आरोप कोर्टात टिकले नाही. या हत्येनंतरच कामगारांची मोठी संख्या असलेल्या आणि कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेल्या परळ मतदारसंघाच पोटनिवडणूक झाली. यात शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय होऊन शिवसेनेचा पहिला आमदार विधीमंडळात पोहचला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know all about history of shivsena first mla election victory krishna desai murder pbs