‘प्राचीन शिल्पकृती’ या शीर्षकाचे एक प्रदर्शन सध्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयामध्ये सुरू आहे. ‘गोष्ट मुंबईची’च्या या पूर्वीच्या दोन भागांमध्ये आपण या प्रदर्शनासाठी ग्रीस, रोम, इजिप्त आणि असेरिअन संस्कृतीतून आलेल्या शिल्पकृती समजून घेतल्या. या भागामध्ये चर्चा आहे ती भारतीय शिल्पकृतींची. जगातील सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये निसर्गपूजनापासूनच दैवतीकरणाला सुरुवात झालेली दिसते. भारताच्या बाबतीत निसर्गपूजनाच्या बरोबरच तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातही निसर्गाचा मोठाच प्रभाव राहिला आहे. कमळाच्या रूपाने हा तत्त्वज्ञानाचा प्रभाव हिंदू, बौद्ध, जैन सर्वच धर्मांमध्ये पाहायला मिळतो. तर निसर्गाचेही बेमालूम दैवतीकरण भारतीय संस्कृतीमध्ये झालेले दिसते. तशाच स्वरूपाच्या मिथकांनाही या संस्कृतीने जन्म दिला. त्यांचा भारतातील प्रवास पाहायचा आणि जागतिक पटलांवरचे त्यांचे महत्त्व समजून घ्यायचे तर मग विदिशेहून आलेला हा यज्ञवराह आणि अमरावतीच्या स्तूपाच्या रेलिंगचा भाग असलेले हे कमळपदक समजून घ्यायलाच हवे!
मुंबईतील अशाच वेगवेगळ्या रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी ‘गोष्ट मुंबईची’ या मालिकेतील इतरही भाग नक्की पहा.