मुंबई : जानेवारी महिन्यांत खासकरून अनुभवास येणारी गुलाबी थंडीचा आनंद अद्याप तरी घेता आला नाही. जानेवारीचा तिसरा आठवडा सुरू झाला आहे. तरीही राज्यात गुलाबी थंडीची प्रतिक्षा कायम आहे. बंगालच्या उपसागरातून सातत्याने बाष्पयुक्त वारे राज्यात येत राहिल्यामुळे उत्तरेतील थंडी राज्यात पोहचलीच नाही. राज्यात प्रामुख्याने नोव्हेंबर, डिसेंबरची बोचरी, कडाक्याची थंडी कमी होऊन जानेवारी महिन्यात हमखास अल्हाददायी गुलाबी थंडी पडते. राज्यभरात किमान पारा, पहाटेचे तापमान दहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाऊन गुलाबी थंडीचा आनंद घेता येतो. यंदा डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रात पारा आठ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता. त्यानंतर विदर्भातील काही ठिकाणांचा अपवाद वगळता किमान पारा १३ ते १७ अंश सेल्सिअस दरम्यान राहिला आहे.

जानेवारी महिन्यातील पहिले दोन आठवडे संपून, तिसरा आठवडा सुरू झाला आहे. राज्यभरात उबदार रात्रीचा अनुभव येत आहे. पहाटे काहीकाळ पारा खाली जात असला तरीही दहा वाजताच पारा २० अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊन दुपारपर्यंत २५ ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत स्थिरावत आहे. त्यामुळे ऐन थंडीत दिवसा उकाड्याचा अनुभव येत आहे. गुलाबी थंडीसाठी आता जानेवारीतील दहा आणि फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरावड्याचाच काळ बाकी राहिला आहे. फेब्रुवारीच्या मध्यपासून तापमान वाढ जाणवू लागते. त्यामुळे यंदा गुलाबी थंडीला आपण मुकणार का ? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

हेही वाचा >>>मुंबई : तीन भावंडांची सामाजिक संदेश पेरणारी धाव; स्वच्छता राखा, मुली वाचवा आणि हवा प्रदूषण रोखण्याचा संदेश

हिमालयीन रांगांसह उत्तर भारतात पश्चिमी विक्षोप सक्रीय आहे. राजस्थान, दिल्लीसह उत्तर भारतात पारा पाच, सहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. दाट धुकेही पडत आहे. पण, बंगालच्या उपसागरावरून सातत्याने बाष्पयुक्त वारे राज्यात येत राहिल्यामुळे उत्तरेतून थंड वारे राज्यात येण्यास अटकाव निर्माण झाला आहे. बाष्पयुक्त वाऱ्याचा जोर असल्यामुळे थंड वारे राज्यापर्यंत येत नाहीत. त्यामुळे रात्री उबदार, तर दुपारी उकाडा जाणवत आहे.

तापमानात काहिशी घट शक्य

सध्या राज्यात किमान, कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त जाणवत आहे. पण, पुढील दहा दिवस राज्यभरात पहाटेच्या तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याचा अंदाज आहे. किमान तापमान १० ते १२ अंश सेल्सिअसपर्यंत स्थिरावण्याचा अंदाज आहे. सध्याचा रात्रीचा ऊबदारपणा कमी होऊन, काहिशी थंडी जाणवण्याची शक्यता आहे, अशी माहिती निवृत्त हवामान शास्त्रज्ञ  माणिकराव खुळे यांनी दिली.

Story img Loader