अतिरिक्त आयुक्तांची सभागृहात माहिती

मुंबई : सीमांकन पूर्ण होताच शहरातील कोळीवाडे आणि गावठाण मुंबईच्या विकास आराखडय़ात सहभागी करून घेतले जातील, अशी माहिती सोमवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब  जऱ्हाड यांनी सभागृहात दिली.

पालिका सभागृहात कोळीवाडे, गावठाणांच्या प्रश्नांवरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ‘झोपु’योजना राबवून अनेक कोळीवाडे मुंबईच्या नव्या विकास आराखडय़ातून गायब करण्यात आले, असा आरोप करत पुनर्विकास धोरणाकडे शिवसेनेच्या शितल म्हात्रे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. वर्षभरापुर्वी मत्स्य उत्पादन खात्याने मच्छिमारांची लोकसंख्या, त्यांच्या बोटी आदी निकषांवर आधारीत कोळीवाडे निश्चित केले. या अहवालामुळे अनेक कोळी बांधवांना हक्काच्या घरांना मुकावे लागेल, असा दावा त्यांनी केला.

तर राज्य सरकार, महापालिकेला कोळी समाजाबद्दल आपुलकी असल्यास तातडीने कोळीवाडय़ांच्या विकासाचे धोरण निश्चीत करा, असे आवाहन विरोधी पक्षनेते रवी राजा  यांनी केले. त्यावर मागील ४० वष्रे कॉंग्रेसची सत्ता असताना आपण काय केले, असा प्रश्नांना उपस्थित करून काँग्रेसवर कुरघोडी केली.  सभागृहात पाऊण तास नगरसेवकांनी  मते मांडल्यानंतर अतिरिक्त आयुक्त कोळीवाडे, गावठाण यांचे सीमांकन अंतिम टप्प्यात असल्याची माहिती जऱ्हाड यांनी सभागृहाला दिली. तसेच कोळीवाडय़ांत राहाणाऱ्या प्रत्येकाची माहिती गोळा केली जात आहे. घर किती जुने आहे, घरात राहाणाऱ्यांची भाषा, त्यांचा व्यवसाय आदींबाबत अभ्यास केला जात आहे. हे सिमांकन, सव्‍‌र्हेक्षण पूर्ण होताच कोळीवाडय़ांना विकास आराखडय़ात स्वतंत्रपणे सहभागी करण्या येईल, असा दावा त्यांनी केला. मात्र त्यांच्या या उत्तराने नगरसेवकांचे समानाधान झाले नाही. त्यामुळे महापौर विश्वनाथ महाडेश्व्र यांनी प्रशासनाने आपला अहवाल सभागृहात सादर करावा, असे आदेश दिले.

Story img Loader