मुंबई : कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डाॅक्टरवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिची करण्यात आलेल्या हत्येमुळे एकच खळबळ उडाली असून या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘मार्ड’ने राज्यभरात संप पुकारला आहे. मात्र या संपाचा फारसा परिणाम रुग्णसेवेवर झालेला नाही. मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, नायर, शीव व कूपर रुग्णालयामध्ये अत्यावश्यक सेवा सुरू असून संपाच्या दृष्टीने डॉक्टरांचे नियोजन केल्याने बाह्यरुग्ण विभाग व शस्त्रक्रियांवरही फारसा परिणाम झालेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोलकाता येथे निवासी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनने (फोर्डा) १३ ऑगस्ट रोजी बेमुदत संप पुकारला होता. या संपाला राज्यातील ‘केंद्रीय मार्ड’बरोबरच ‘बीएमसी मार्ड’नेही पाठिंबा देत मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून संप पुकारला. या प्रकरणाचा केंद्रीय प्राधिकरणामार्फत तात्काळ निष्पक्ष, पारदर्शक आणि सखोल तपास करावा, आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांवर पोलीस कारवाई करू नये, केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना करणे, आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे कार्यरत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे आणि सुसज्ज रक्षकांसह सुरक्षाविषयक उपाययोजनांमध्ये सुधारणा करावी, वैद्यकीय संस्थांमधील सुरक्षाविषयक उपाययोजनांचे १५ दिवसांत ‘मार्ड’च्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ऑडिट करावे, सुरक्षा रक्षकांची भरती करावी, निवासी डॉक्टरांना दर्जेदार वसतिगृहे तसेच कॉलरुम्स उपलब्ध करावी आदी मागण्यांसाठी केईएम, नायर, शीव, कूपर आणि जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – तब्बल २५ वर्षांनंतर ‘म्हाडा’ला जाग, इरई नदीकाठी ‘नवीन चंद्रपूर’

संपादरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्व रुग्णसेवा बंद ठेवण्याचा निर्णय ‘मार्ड’ने घेतला. कोलकाता प्रकरणाचा निषेध करण्यासाठी सर्व रुग्णालयातील डॉक्टरांनी सकाळी रुग्णालय परिसरात निदर्शने केली. तसेच सोमवारी रात्री सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कॅंडल मार्च काढण्यात आला होता.

हेही वाचा – भारतीय पारपत्रावर परदेशात जाणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला विमानतळावर अटक

‘मार्ड’ने संपाची घोषणा केल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने रुग्णसेवा बाधित होऊ नये यासाठी रुग्णसेवेसाठी नियोजन केले. त्यामुळे रुग्णसेवेवर फारसा परिणाम झाला नाही. बाह्यरुग्ण विभागामध्ये महाविद्यालयातील विभागप्रमुख, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी डॉक्टर, शिकाऊ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसेवेवर फारसा परिणाम झाला नाही. मात्र रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचे निदर्शनास आले. त्याच वेळी अतिमहत्त्वाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तातडीच्या नसलेल्या काही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. दरम्यान, काही रुग्णालयांमध्ये केलेल्या नियोजनामुळे नियमित शस्त्रक्रियाही करण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolkata doctor rape case state wide strike of mard mumbai print news ssb