साहित्यविषयक विविध उपक्रम, मेळावे, संमेलन, पुरस्कार आदी कार्यक्रम राबवून मराठी साहित्य विश्वात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारी कोकण मराठी साहित्य परिषद ही संस्था आता फुटीच्या उंबरठय़ावर उभी आहे. ज्या रत्नागिरी जिल्ह्यातून ‘कोमसाप’ची सुरुवात झाली तेथील काही शाखा बंद पडल्या असून अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. संस्थेतील कामात पारदर्शकतेचा अभाव आणि विशिष्ट व्यक्तींच्या मनमानीला कंटाळून नाराजीतून ही फूट पडली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. पदाधिकाऱ्यांची ही नाराजी वादळापूर्वीची शांतता असल्याचे सांगण्यात येते. चिपळूण येथे येत्या ११ ते १३ जानेवारी दरम्यान होणारे ८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडल्यानंतर ‘कोमसाप’तील हे अंतर्गत वाद चव्हाटय़ावर येणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ‘कोमसाप’मध्ये काही जणांची मनमानी चालली असून संस्थेच्या कामात पारदर्शकता राहिली नसल्याचे काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. चिपळूण येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने काही प्रमाणात या वादाचा धुरळा उडाला होता. मात्र तो लगेच शमला. ‘कोमसाप’मध्ये काही वाद नाही, सर्व आलबेल असल्याचे त्यावेळी ‘कोमसाप’च्या वरिष्ठांकडून सांगण्यात आले होते. ‘कोमसाप’च्या रत्नागिरी शाखेसह देवरुख, गुहागर आदी शाखाही बंद पडल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील फक्त दापोली शाखा सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ‘कोमसाप’च्या अनेक कार्यकर्त्यांनी आता ‘कोमसाप’चे काम बंद केले असून अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे ‘कोमसाप’च्या वरिष्ठांकडे सादर केले आहेत. काही जणांनी अखिल भारतीय साहित्य महामंडळाची घटक संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे काम सुरू केले असल्याची माहितीही या सूत्रांनी दिली.  या संदर्भात ‘कोमसाप’चे अध्यक्ष महेश केळुस्कर यांच्या भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधूनही ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत, तर संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांचीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा