मुंबई : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य, कोकण रेल्वेवरून आंगणेवाडी यात्रेसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते सावंतवाडी रोडदरम्यान विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येतील. कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०११२९ विशेष रेल्वेगाडी एलटीटीवरून २१ फेब्रुवारी रोजी रात्री १२.५५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुपारी १२ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११३० विशेष रेल्वेगाडी सावंतवाडी रोड येथून २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सुटेल आणि एलटीटीला सकाळी ६.१० वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांवर थांबा असेल. या रेल्वेगाडीला एकूण १९ डबे असतील.

गाडी क्रमांक ०११३१ एलटीटीवरून २२ फेब्रुवारी रोजी रात्री १२.५५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोडला दुपारी १२ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११३२ सावंतवाडी रोडवरून २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सुटेल आणि एलटीटीला सकाळी ६.१० वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांवर थांबा असेल. या गाडीला एकूण २२ डबे असतील. सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून ९ फेब्रुवारीपासून या रेल्वेगाडीचे आरक्षण करता येईल.

दरवर्षी पाच ते सात लाख नागरिकांची उपस्थिती

मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची वार्षिक जत्रा यंदा २२ फेब्रुवारी रोजी होणार आहे. आंगणेवाडीतल्या आंगणे कुटुंबाची ही देवी आहे. मात्र ही जत्रा सर्वांसाठी खुली असते. दरवर्षी देवीला कौल लावून, धार्मिक विधी करून जत्रेचा दिवस निश्चित करण्यात येतो. शेतीचा एक हंगाम संपल्यानंतर आणि खरिपाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी ही जत्रा होते. त्यानुसार यंदाचीही तारीख निश्चित करण्यात आली आहे. आंगणेवाडीची जत्रा महाराष्ट्रासह देश-विदेशातल्या पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. दीड दिवस चालणाऱ्या भराडी देवीच्या जत्रेला दरवर्षी सुमारे पाच ते सात लाख नागरिक सहभागी होत असल्याचे सांगितले जाते. मुंबईतील चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल होत असतात. या जत्रेनंतर अगदी पाडव्यापर्यंत कोकणात जत्रांचा हंगाम असतो. त्यामुळे पर्यटक, प्रवाशांची वर्दळ वाढते. या जत्रेनंतर शिमग्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांचीही गर्दी कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना वाढत जाते.

Story img Loader