मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण सुरू झाले असून कोकणवासीयांची आरक्षित तिकिटे काढण्यासाठी धडपड सुरू आहे. मात्र, कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण सुरू झाल्यानंतर काही मिनिटांत प्रतीक्षा यादीचे फलक लागून, प्रतीक्षा यादीची मर्यादाही संपल्याचे संदेश नागरिकांना येऊ लागले आहेत. कोकणकन्या एक्स्प्रेसचे आरक्षण मंगळवारी सुरू झाल्यानंतर अवघ्या एका मिनिटांतच प्रतीक्षा यादी ५०० पार गेली. त्यामुळे यात तिकीट आरक्षणात गैरप्रकार होत असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे.
यंदा ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून मुंबई महानगरातील कोकणवासीय कोकणातील मूळ गावी जाण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार गणेश चतुर्थीच्या एक आठवडा आधीच कोकणात जाण्याचे नियोजन केले आहे. भारतीय रेल्वेवरील नियमित रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण रेल्वे सुटण्याच्या १२० दिवसापासून सुरु होते. त्यामुळे १ सप्टेंबर रोजी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाडीचे तिकिटे ४ मेपासून काढण्यास सुरुवात झाली. गणेश चतुर्थीच्या तीन दिवस आधी म्हणजे ४ सप्टेंबर रोजीचे तिकीट काढण्यासाठी कोकणवासीयांची प्रचंड लगबग सुरू होती. त्यासाठी तिकीट केंद्रावर आदल्या रात्रीपासून रांगा लावण्यात येत आहेत. त्यानंतर ४ सप्टेंबरचे आरक्षण ७ मे रोजी सकाळी ८ वाजता सुरू झाल्यानंतर १ मिनिट ३ सेकंदात कोकणकन्याची प्रतीक्षा यादी ५८० च्या पुढे गेली. त्यानंतरची इतर कोकणात जाणाऱ्या एक्स्प्रेसची तिकिटे काढण्यास गेल्यास ‘रीग्रेट’ दाखवण्यात येत आहे.
हेही वाचा : वडेट्टीवार यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
वंदे भारतसाठीही प्रतीक्षा
जनशताब्दी एक्स्प्रेसच्या द्वितीय आसन श्रेणीची प्रतीक्षा यादी ४ सप्टेंबर रोजी ‘रिग्रेट’ दाखविण्यात येत होती. तसेच कोचुवेली एक्स्प्रेसचे शयनयान, द्वितीय श्रेणी वातानुकूलित, तृतीय श्रेणी वातानुकूलित असे सर्व डब्याची प्रतीक्षा यादी ‘रिग्रेट’ होती. यासह मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेस आणि नेत्रावती एक्स्प्रेसचे शयनयान, द्वितीय श्रेणी वातानुकूलित, तृतीय श्रेणी वातानुकूलित, वातानुकूलित ३ इकॉनॉमी डबा ‘रीग्रेट’ मध्ये होता. श्री गंगानगर-कोचुवेली एक्स्प्रेस, तुतारी एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेसचे शयनयान डबे ‘रिग्रेट’ होते. तर, वंदे भारतच्या वातानुकूलित चेअर कार डब्याची प्रतीक्षा यादी १६८ होती.
हेही वाचा : हैदराबादचा लखोबा लोखंडे अटकेत, मेट्रिमोनियल साईटद्वारे सात तरुणींशी विवाह करुन लाखोंचा गंडा
बनावट खाती
गेल्यावर्षी गणेशोत्सवाची तिकिटे काढताना कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी अवघ्या दीड मिनिटांतच एक हजारांपार गेली होती. त्यानंतर त्यात तिकीट आरक्षणात गैरप्रकार झाल्याची शंका प्रवाशांकडून व्यक्त केली होती. तपासअंती यात अनेक तिकीट आरक्षण खाती बनावट असल्याचे उघड झाले होते.
हेही वाचा : लोकसभा जागावाटपाची भरपाई विधानसभेत करू! महायुतीत अधिक जागा मिळवण्याचे प्रफुल पटेल यांचे संकेत
काही मिनिटांचा खेळ
मुंबईतून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या मार्गावर जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण ७ मे रोजीपासून सुरू झाले. ७ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून पुढील १२० दिवसांचे म्हणजे ४ सप्टेंबरपर्यंतचे तिकीट काढता येणे शक्य आहे. मात्र, सकाळी ८ वाजता तिकीट काढण्यास सुरुवात केली असता काही मिनिटांतच कोकणात जाणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा यादीची क्षमता संपली. त्यामुळे प्रत्येक रेल्वेगाडीची प्रतीक्षा यादी ‘रीग्रेट’ दाखविण्यात येत होती.