मंगल हनवते, लोकसत्ता
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार – बोळींज येथील गृहप्रकल्पातील शिल्लक घरे विकलीच जात नसल्याने मंडळाची डोकेदुखी वाढली आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्वावरही सोडतीत या घरांची विक्री होऊ शकलेली नाही. त्यामुळे आता कोकण मंडळाने या घरांच्या विक्रीसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोकण मंडळाच्या सप्टेंबरमधील सोडतीत प्रथम प्राधान्य तत्वावर विरार – बोळींजमधील २२११ घरांचा समावेश करण्यात येणार असून यापैकी प्रतिसाद मिळणाऱ्या घरांची सोडत जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रतिसाद न मिळालेल्या घरांसाठी तात्काळ नोंदणी, अर्ज विक्री – स्वीकृती प्रक्रिया सुरू होईल. मागणी करणाऱ्या पात्र अर्जदाराला या घराचे वितरण करण्यात येणार आहे. तर २२११ पैकी शेवटच्या घराची विक्री होईपर्यंत अर्ज विक्री – स्वीकृती, वितरण प्रक्रिया सुरूच राहणार आहे.
हेही वाचा >>> मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; लवकरच प्रवास सुलभ होणार, गोरेगाव-मुलुंड ट्विन टनेलच्या कामाचा मुहूर्त ठरला!
कोकण मंडळाने बोळींज येथे सर्वात मोठा सुमारे दहा हजार घरांचा प्रकल्प हाती घेतला आहे. यातील अंदाजे नऊ हजार घरे बांधून पूर्ण झाली असून यापैकी सुमारे सहा हजार घरांची विक्री झाली आहे. मात्र या प्रकल्पात पिण्याच्या पाण्यासह विविध समस्या असून प्रत्यक्षात अंदाजे २१०० घरात रहिवाशी राहत आहेत. तर दुसरीकडे या प्रकल्पातील दोन हजारांहून अधिक घरे विकलीच गेलेली नाहीत. या घरांसाठी दोन ते तीन वेळा सोडत काढूनही ही घरे विकली गेलेली नाहीत. अखेर मंडळाने मे २०२३ च्या सोडतीत येथील २०४८ घरांचा समावेश ‘प्रथम प्राधान्य’ योजनेत केला. ‘प्रथम प्राधान्य’ योजनेत कोणालाही घर खरेदी करता येते. यात अनेक अटी शिथिल असतात. अगदी येईल त्याल घर या तत्वाने घराची विक्री होते. पण असे असतानाही मेमधील सोडतीतही २०४८ पैकी शे-दीडशे घरे विकली गेली. त्यामुळे कोकण मंडळाची डोकेदुखी आणखी वाढली आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर कोकण मंडळाने या घरांच्या विक्रीसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बोळींजमधील ‘प्रथम प्राधान्य तत्वा’वरील घरांसाठी अर्ज विक्री – स्वीकृती आणि घराचे वितरण ही प्रक्रिया कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात येणार आहे. सप्टेंबरच्या सोडतीत २१२२ घरांचा समावेश करण्यात येणार आहे. या घरांचा ‘प्रथम प्राधान्य योजने’त समावेश असेल. सप्टेंबरमध्ये प्रतिसाद मिळणाऱ्या घरांसाठी सोडत काढून त्यांचे वितरण करण्यात येणार आहे. मात्र प्रतिसादाअभावी विक्री न होणाऱ्या घरांसाठी सोडतीनंतर तात्काळ अर्ज विक्री – स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. जो कोणी अर्ज करेल, अनामत रक्कम भरेल आणि पात्र ठरेल त्याला घराचे वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.