मुंबई : मागील वर्षभरापासूनची कोकण मंडळाच्या सोडतीची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. कोकण मंडळाच्या सुमारे चार हजार घरांच्या सोडतीसाठी पुढील आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सोडतीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मुंबई-ठाणेकरांसाठी ही आनंदाची बाब असून ठाण्यात १५ ते ४४ लाख रुपयांत घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
म्हाडा सोडतीच्या नोंदणीस आणि पुणे मंडळाच्या ५९९० घरांच्या सोडतीच्या अर्जविक्री-स्वीकृतीस गुरुवारपासून सुरुवात करण्यात झाली आहे. तर आता रखडलेली कोकण मंडळाची सोडत मार्गी लावण्याच्या कामाला वेग देण्यात येत आहे. त्यानुसार अंदाजे चार हजार घरांच्या सोडतीस, तसेच घरांच्या किंमतींच्या प्रस्तावास म्हाडा उपाध्यक्षांची मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. ही मंजुरी मिळाली की तात्काळ पुढील आठवड्यात अंदाजे चार हजार घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती मंडळातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.
या सोडतीत नेमकी किती, कुठे घरे असतील आणि या घरांच्या अंदाजीत किंमती काय असतील याची माहिती ‘लोकसत्ता’च्या हाती लागली आहे. त्यानुसार २० टक्क्यांतील अंदाजे १२५०, पंतप्रधान आवास योजनेतील अंदाजे ६५० आणि म्हाडा प्रकल्पातील अंदाजे २०५० घरांचा सोडतीत समावेश असणार आहे. कोकण मंडळाने यापूर्वी अंदाजे अडीच हजार घरांसाठी सोडत काढण्यात येईल, असे जाहीर केले होते. मात्र घरांची संख्या कमी असल्याने यापूर्वीच्या सोडतीतील विक्री न झालेली घरे शोधून त्यांचा समावेश या सोडतीत करण्यात आला आहे. त्यामुळे घरांची संख्या चार हजारांवर गेली आहे. दरम्यान, २० टक्क्यांतील घरांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. या सोडतीत अत्यल्प आणि अल्प गटासाठी २० टक्क्यांतील अंदाजे १२५० घरे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या १२५० पैकी २४९ घरे ठाण्यातील पाचपाखाडी तेथील रेमंड प्रकल्पातील आहेत. ही सर्व घरे अत्यल्प गटासाठी असून अंदाजे ३०० चौरस फुटांच्या या घरांची अंदाजित किंमत १५ लाख ५० हजार रुपये आहे. तर सानपाडा येथे गुडविल प्रकल्पातील २५ घरे अल्प गटासाठी असणार आहेत. अंदाजे ३५० चौरस फुटांच्या या घरांची किंमत १६ ते १८ लाख रुपयांदरम्यान असेल. घणसोली येथे अल्प गटासाठी २४ घरे असून ही घरे ४५० चौ. फुटांपेक्षा मोठी आहेत. ही घरे २४ लाख रुपयांना विकली जाणार आहेत.
घोडबंदर येथील पुराणिक समुहाच्या प्रकल्पातील ५९ घरे अत्यल्प गटासाठी, तर एक घर अल्प गटासाठी उपलब्ध होणार आहे. या घराची किंमती १६ ते १६ लाख ५० हजार रुपये अशी असणार आहे. याशिवाय पंतप्रधान आवास योजनेतील खोणीतील अत्यल्प गटातील ६० घरे सोडतीत असून या घरांची अंदाजीत किंमत १७ लाख १५ हजार १६४ रुपये अशी असणार आहे. शिरढोणमधील (अत्यल्प गट) ३४० घरांसाठी मंडळाने १४ लाख रुपये अशी अंदाजित किंमत निश्चित केली आहे. गोठेघर येथील (अत्यल्प गट) २५६ घरांचाही त्यात समावेश असून या घरांची विक्री किंमत १७ लाख रुपये आहे. त्याचवेळी विरारमधील शिल्लक घरांचाही सोडतीत समावेश असून या घरांच्या किंमती थेट ५० लाख रुपयांवर गेल्या आहेत.
हेही वाचा – मुंबई : रखडलेल्या ३८ प्रकल्पांबाबत म्हाडाकडे कृती योजनेचा अभाव
वर्तक नगर येथे डिजिटल माध्यमातील पत्रकारांसाठी ६७ घरे
या सोडतीत ठाण्यातील वर्तकनगर येथील अल्प गटातील ६७ घरे पत्रकारांसाठी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती मंडळातील अधिकाऱ्याने दिली. अंदाजे ३१० ते ३५० चौरस फूट क्षेत्रफळाच्या घरासाठी ४० ते ४४ लाख रुपये अशी अंदाजित किंमत निश्चित करण्यात आली आहे. ही घरे पत्रकारांसाठी राखीव आहेत. असे असले तरी या घरांसाठी केवळ डिजिटल माध्यमातील पत्रकारच अर्ज करू शकणार असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.