कर्नाटक, केरळच्या आंब्यांची आवक वाढल्याने हापूसच्या मागणीला ओढ
दक्षिण भारतातून फळांची मोठी आवक झाल्याने यंदा कोकणातील फळ व्यापाऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागतो आहे. फणसापाठोपाठ आता आंब्यावरही याचा परिणाम होत असून कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यांतून आलेल्या आंब्यांमुळे यंदा कोकणातील हापूस आंब्यांवर गंडांतर आले आहे. त्यातच यंदा रोगांच्या प्रादुर्भावामुळे आणि वातवरणीय बदलांमुळे कोकणातील आंब्याची आवाक कमी झाली असताना मात्र, दक्षिण भारतीय आंब्याची आवक वाढली असून हेच आंबे कोकणी हापूस म्हणून मुंबईसह, ठाणे व अन्य उपनगरात विकले जात आहेत.
मुंबईकरांच्या तोंडी यंदा कोकणातील देवगड, रत्नागिरीच्या हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटकी हापूस लावला जात आहे. दादर, ठाणे व अन्य उपनगरांमधील मोठय़ा बाजारपेठांमध्ये परप्रांतीय विक्रेते खोक्यांमधून विक्री करत असलेले आंबे हे कोकणी हापूस नसून ते कर्नाटकी हापूस अथवा दक्षिण भारतातील अन्य राज्यांतून आलेले आंबे आहेत. याचे कारणही असेच असून यंदा रोगांचा प्रादुर्भाव, अवकाळी पाऊस, वातावरणीय बदल याचा मोठा फटका कोकणातील हापूस आंब्याला बसला आहे. मात्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ येथे आंबा पीक मोठय़ा प्रमाणावर आले असून या प्रांतातील आंबा मोठय़ा प्रमाणात नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आला आहे. यातही मुख्यत्वे कर्नाटकातील हुबळी, धारवाड, टुमकूर येथून आलेल्या कर्नाटकी हापूसची आवक जादा असल्याचे बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी सांगितले.
परप्रांतीय विक्रेत्यांपासून सावधान
दक्षिण भारतीय आंबा कोकणी हापूसच्या तुलनेत स्वस्त असल्याने होलसेल भावात खरेदी करून परप्रांतीय विक्रेते मुंबई, ठाण्यासह अन्य उपनगरात आणून विकत आहेत. दादार रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला व बाबाराव सावरकर चौकात ठिकठिकाणी रस्त्यावर बसलेल्या फेरीवाल्यांकडे हेच आंबे विक्रीला असून ते देवगड हापूस म्हणून गिऱ्हाईकांना फसवून विकत आहेत.
कर्नाटकी हापूस स्वस्त
देवगड व रत्नागिरी येथून येणारा हापूस आंबा हा सध्या बाजारपेठेत ७०० ते ८०० रुपये डझन दराने मिळतो आहे. मात्र, कर्नाटकी हापूस ३५० ते ४०० रुपये डझनात सहज उपलब्ध होत आहे. सध्या दररोज, बाजार समितीत १ लाखाच्या आसपास आंब्याच्या पेटय़ा येत असून यातील ६० हजार पेटय़ा या परराज्यातून येत असून ४० हजार पेटय़ा या कोकणातून येत आहे. त्यामुळे एकंदर या आंब्यांमुळे कोकणी आंब्याला दर कमी मिळत आहे. अशी माहिती आंब्याचे व्यापारी व नवी मुंबई कृषी उत्पन्न समितीचे माजी संचालक संजय पानसरे यांनी दिली.
कर्नाटकी हापूस ओळखाल कसा?
कर्नाटकी हापूस हा आतून पिवळा असून कोकणातील हापूस आतून केसरी असतो. कर्नाटकी हापूस हा खाली निमुळता होतो व त्यांच्या देठाभोवती खोलगट भाग नसून त्यांची साल ही जाड असते. मात्र, कोकणी हापूसचा खालचा भाग हा गोलसर असून त्याच्या देठाभोवती खोलगट भाग असतो व त्याची साल जाड नसते. तसेच, कोकणी हापूस हवा असल्यास रस्त्यावरील फेरीवाल्यांकडून आंबे घेण्याऐवजी मोठे व्यापारी अथवा दुकानांमधून आंबा घ्यावा. असेही पानसरे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा