हापूस आंब्याची आतुरतेने वाट बघणाऱ्या मुंबईकरांना दरवर्षीप्रमाणेच यंदाही ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत किंवा स्वस्त दरातील आंब्यासाठी किमान काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. कारण फेब्रुवारी महिन्यापासून कोकणातील आंब्यावर ‘थ्रीप्स’ व ‘हॉपर्स’ या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने आवक घटल्याचे आंबे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच आलेल्या आंब्यांची परदेशातही निर्यात सुरू झाल्याने मुंबईकरांना जेमतेम चवीपुरताच आंबा लाभण्याची चिन्हे आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागली की कोकणातून येणाऱ्या हापूस आंब्याची मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरातील नागरिक चातकासारखी वाट पाहात असतात. दरवर्षी आंब्याचे भाव गगनाला भिडलेले असल्याने अनेकांची यामुळे निराशाही होते. यंदाही चोखंदळ खवय्यांच्या मुखी आंबा काहीसा उशिराने लागणार आहे. तसेच तो महागही होण्याची चिन्हे आहेत. कारण गेल्या फेब्रुवारी महिन्यात कोकणात आलेल्या ‘थ्रीप्स’ व ‘हॉपर्स’ रोगांमुळे आंब्याची आवक किमान आठ ते दहा हजार पेटय़ांनी घटल्याचे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व आंबे व्यापारी संजय पानसरे यांनी सांगितले. यातील ‘थ्रीप्स’ या रोगामुळे आंब्याचा आकार चिकूइतका कमी होतो तर, ‘हॉपर्स’ या रोगामुळे आंबे काळे पडतात. मध्यंतरी वातावरणात झालेल्या बदलांमुळे हा रोग पसरला असल्याची शक्यता आहे. तसेच, ‘थ्रीप्स’ रोगावरील उपचारांसाठीची औषधे महाग असल्याने शेतकऱ्यांना ती परवडत नाहीत.
आवक घटली
डिसेंबर महिन्यापासून आंब्याची आवक सुरू झाली असून मार्च महिन्यात ही आवक वाढते. सध्या दररोज आंब्याच्या २० ते २८ हजार पेटय़ा बाजार समितीत दाखल होत आहेत. मात्र या काळात किमान ३५ हजार पेटय़ा येण्याची अपेक्षा होती. मात्र या रोगांच्या प्रादुर्भावाने ही आवाक घटल्याचे पानसरे म्हणाले. त्यामुळे सध्या बाजारभावाचा विचार करता कच्च्या आंब्याची किंमत ही घाऊक भावाने ३०० ते ८०० रुपये डझन आहे. आठ-दहा दिवसांनी हा पूर्ण पिकलेला आंबा ६०० ते १५०० रुपये डझन भावाने बाजारात नागरिकांना विकला जात आहे. त्यामुळे नागरिकांना एप्रिल महिन्यात स्वस्तात आंबे मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.
परदेशी निर्यात सुरू
कोकणातील आंब्याच्या परदेशवारीला सुरुवात झाली असून सध्या अरब राष्ट्रांत आंबा जाण्यास सुरुवात झाली आहे. कोकणातून दररोज दाखल होणाऱ्या या २० ते २८ हजार पेटय़ांमधील किमान २५ टक्के आंबा हा अरब राष्ट्रांत जात असल्याचे पानसरे यांनी स्पष्ट केले. तसेच पुढील आठवडय़ापासून युरोपात हा आंबा पोहचण्यास सुरुवात होत असून १५ एप्रिलपासून आंब्याची अमेरिकावारी सुरू होईल.