मुंबई : गेल्या दोन दशकात कोकण रेल्वेवरील प्रवासी संख्या रेल्वेगाड्या आणि स्थानकाची संख्या वाढली. मात्र कोकण रेल्वेचे दुहेरीकरण प्रलंबित असल्याने, कोकण रेल्वे प्रवाशांचा गैरसोयीचा प्रवास होतो. प्रवाशांचा प्रवास सुरळीत, वेळेत होण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून टप्पा दुहेरीकरण (पॅच डब्लिंग) करण्यावर भर दिला आहे. टप्पा दुहेरीकरण करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल रेल्वे मंडळाकडे सुपूर्द केला आहे.

कोकण रेल्वेचा पसारा हा रोहा ते ठोकुर अशा ७४० किमी अंतरापर्यंत पसरलेला आहे. मात्र कोकण रेल्वेवर रोहा ते वीर ४६.८ किमीचा रेल्वे मार्गाचे ऑगस्ट २०२१ रोजी दुहेरीकरण पूर्ण झाले. मात्र त्यानंतर दुहेरीकरणाबाबत जलदगतीने पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास रखडत होतो. उत्तर आणि दक्षिण भारताला कमी प्रवास खर्चात आणि जलदगतीने जोडण्याचे काम कोकण रेल्वेकडून करण्यात येते. मात्र, वाढत्या गर्दीला सामावून घेण्याची क्षमता कोकण रेल्वेमध्ये नसल्याने, अनेक वर्षांपासून कोकण रेल्वेचे दुहेरीकरण करण्याचा मागणी आहे. मुंबईस्थित कोकणवासियांचे कोकणात जाताना प्रचंड हाल होतात. उशिरा रेल्वेगाड्या धावणे, जादा रेल्वेगाड्या नसणे, मर्यादित स्थानकांना थांबा असणे, अवेळी विशेष रेल्वेगाड्या चालवणे अशा समस्या प्रवाशांना भेडसावतात.

हेही वाचा…शंभर टक्के नालेसफाईचा दावा खोटा, माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा आरोप; वडाळा, ॲंटॉप हिल परिसरातील नाले कचऱ्याने तुडूंब

कोकण रेल्वेचे संपूर्ण दुहेरीकरण करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे कोकण रेल्वेवरील प्रवाशांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आता टप्पा दुहेरीकरण करण्याकडे कोकण रेल्वे प्रशासनाचे नियोजन आहे.

सपाट जमिनीवर रेल्वेच्या प्रतिकिमी दुहेरीकरणासाठी साधारणपणे १५ ते २० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर, घाट, बोगद्याच्या ठिकाणी प्रतिकिमी खर्च ८० ते १०० कोटी रुपये अपेक्षित आहे. रोहा ते वीर दरम्यान दुहेरीकरण करण्यासाठी ५३० कोटी रुपये खर्च आला होता.

हेही वाचा…सकाळी ९ नंतर शाळा सुरू करण्याच्या शासन निर्णयाला बगल ?

रोहा ते वीर असे दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आता मडगाव ते ठोकुर आणि कणकवली ते सावंतवाडी दरम्यान टप्पा दुहेरीकरण केले जाईल. सध्या कोकण रेल्वेवरून दरदिवशी ५५ रेल्वेगाड्या आणि १८ मालगाड्या धावतात. टप्प्या दुहेरीकरण झाल्यास, रेल्वेगाड्या धावण्याची क्षमता दुप्पट होईल. – संतोष कुमार झा, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, कोकण रेल्वे

हेही वाचा…अकरावी प्रवेश प्रक्रिया : उद्यापासून कोटांतर्गत प्रवेशासाठी पर्याय नोंदवता येणार

कोकण रेल्वेचा वक्तशीरपणा वाढवण्याचे ध्येय

कोकण रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास कायम उशिराने होतो. उन्हाळी सुट्टीच्या काळात कोकणात जाणार्‍या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मुंबईहून सुटलेल्या नियमित, विशेष रेल्वेगाड्यांना १ ते २ तास उशिराने धावल्या. तर, काही रेल्वेगाड्या यापेक्षाही अधिक विलंबाने धावल्याने प्रवाशांचा रेल्वे प्रवास रखडला. तसेच कोकण रेल्वेवरील ब्लॉक काळात काही रेल्वेगाड्यांना १० तासांपेक्षा जास्त कालावधी लागला. या काळात कोकण रेल्वेचा वक्तशीरपणा ५९ टक्क्यांपर्यंत खाली घरसला होता. तर सध्याच्या घडीला ८० ते ८५ टक्क्यांच्या दरम्यान आहे. दरम्यान, कोकण रेल्वेचा वक्तशीरपणा वाढवण्यावर भर दिला जात आहे. येत्या काळात कोकण रेल्वेचा वक्तशीरपणा ९५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा म्हणाले.